Sunday, October 31, 2010

नवा दृष्टीकोन....


आमच्या माईला नेहमीच कसं सगळ चकाचक लागत.... अगदी काचेसारख स्वच्छ ....सगळ्याच वस्तू ती अगदीच घासून पुसून ठेवायची ...त्यामुळे आमच घर कसं अगदी स्वच्छ असायचं नेहमीच. तीच अस म्हणण होत कि ज्याचं घर स्वच्छ त्यांच्याकडे लक्ष्मीचा अखंड वास असतो आणि सुख समाधान आनंदाने नांदते. त्यामुळे आमच्या घरात सुद्धा सर्वांना स्वच्छतेची आवड होती. म्हणून आम्हीही कधी कधी कंटाळून तिच्या पुण्याकार्यात हातभार लावायचो. तिचे तर कपडेही अगदी पांढरे शुभ्र असायचे. जराही डाग किंवा सुरकुत्या शोधूनही सापडणार नाहीत. त्यामुळे तिचा बाहेर रुबाबही असायचा.

अशीच एकदा ती officla जायला निघाली होती. घाईतच होती जरा ती त्यामुळे मलाही जाता जाता ओरडून गेली..... खडूस कुठची...आजही तिने तिचा आवडता पांढरा ड्रेस घातला होता ...त्यात ती कशी अजूनच छान दिसायची. माईला जाऊन मोजून पंधरा मिनिटे झाली असतील आणि जिन्यातून मोठ्याने आरडाओरड ऐकू आली...आम्ही धावतच खाली पळालो सगळे ...पाहतो तर काय !!

तिचा पांढरा शुभ्र ड्रेसवर चिखलाचे काही शिंतोडे उडाले होते आणि ती त्या पेपरवाल्या मुलावर ओरडत होती .... तो तिला sorry दीदी बोलून तिची माफी मागत होता अन तरी माची माई काही त्याला सोडत नव्हती. अन आम्ही काही बोलणार एवढ्यातच तिने त्याच्या श्रीमुखात लगावून दिली ....बिचारा कोवळा पोर ते कावरबावर झाल अन डोळे भरून रडायलाच लागल ..मलाही गहिवरून आल ...आमची आई पुढे गेली अन त्या मुलाला तिने बाजूला ओढून घेतलं त्याच रडण थांबवून त्याची माफी मागून त्याला पाठवून दिल तिथून ...तो पर्यंत आमची माई पाय आपटत घरी निघून गेली....

घरी पोहचल्यावर पहिलाच प्रश्न ..."तुम्ही माझे आईवडील आहात कि त्या मुलाचे? ज्याने माझा एवढा चांगला ड्रेस खराब करून टाकला. आधीच मला उशीर झाला होता अन त्यात याने मध्येच मोडता घातला ....त्याच्या खराब हातांनी माझे कपडे अजूनच खराब झाले कसे हो तुम्ही असे काहीच का बोलले नाहीत त्याला? "
त्यावर आमचे वडील शांतपणे बोलले " बाळ , त्या मुलाने तुझे कपडे खराब केले म्हणून तू त्याला मारलस , त्याच्यावर ओरडलीस....आपल्या कपड्यांना डाग पडू नये म्हणून तू त्यांची एवढी काळजी घेतेस पण तेवढीच काळजी तू कधी स्वतःचे किंवा दुसर्यांचे मन जपण्यासाठी घेतलीस ? काही चिखलाच्या शिंतोड्यासाठी तू त्या गरीबाला मारलास ...त्याचा विचार केलास ते शाळेतल पोर घर चालवण्यासाठी जेव्हा त्याच्या वयाची मुल साखर झोपेत असतात तेव्हा तो भल्या पहाटे उठून दारोदारी पेपर वाटायला जातो..त्याला नसेल का वाटत कधी तरी आपणही उशिरा पर्यंत अंथरुणात लोळत पडाव...त्याला मायेचा हात तर सोड तू तर त्याला छोट्याश्या गोष्टीसाठी मारलस सुद्धा .... बाळा, वस्तूंवर साठलेली धूळ झाडण सोप्प असत पण मनावर , विचारांवर साठलेली धूळ काढण कठीण असत ...कपड्यांना जितक जपतेस तितकेच स्वतःच्या आणि दुसर्यांच्याही मनाला जपत जा ....मग बघ तुझ मन तुझ्या कपड्यांपेक्षा जास्त स्वच्छ होईल..."

वडिलांच्या या बोलण्यावर माई काहीच बोलली नाही ...ती फक्त मान खाली करून उभी होती ...वरवर साधे दिसणारे आमचे वडील एवढा विचार करतात हे आम्हाला त्या दिवशीच कळलं होत ....त्यांचा हा नवा दृष्टीकोन आम्हाला खूप काही सांगून गेला ...

कोमल .......................................३०/७/१०

Monday, June 28, 2010

बंदिनी


अगदी जन्मापासून ते मृत्युपर्यंत स्त्रीच आयुष्य कोणाशी न कोणाशी जोडलेलं असत. लहानपणी ती कोणाची तरी मुलगी, बहिण मैत्रीण असते आणि लग्नानंतर कोणाचीतरी पत्नी, काकी, मामी,आत्या, मावशी मग आई, आजी अशी अनेक विशेषणे तिच्या नावापुढे लागतात. खरतर स्त्रीत्व हि दैवी देणगी आहे. आजची स्त्री हि सुशिक्षित, सुजन, कमवती आहे. तिला आपल्या हक्कांची, जबाबदारींची, कर्तव्यांची पूर्ण जाणीव आहे. आज ती सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसते आणि एवढेच नाही तर ती विनातक्रार तिचे घरही तेवढ्याच आनंदाने सांभाळते.

बदलत्या काळानुसार तिच्या आचार विचारात खूप बदल झाला आहे. पण बदलत्या काळानुसार समाजाच्या मानसिकतेत कितीसा बदल झाला आहे ? समाजाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कितीसा बदलला आहे? तिच्या स्त्रीत्वाला जपणारे, तिच्या भावनांचा, विचारांचा सन्मान करणारे असे कितीसे लोक आहेत समाजात?
खरोखर विचारात पाडणारे प्रश्न आहेत हे ......

आजही मुलगी जन्माला येण काही खूप आनंददायी गोष्ट नाही आहे. काही खेड्यातून आजही जन्मापूर्वीच तिचा आवाज बंद करण्यात येतो. तिच्या शिक्षणावर खर्च करण हे काही प्रतिष्ठेच लक्षण मानल जात नाही कारण काय तर शेवटी तिला चूल आणि मुलंच सांभाळायच आहे. फक्त नावापुरत शिक्षण दिल जात कारण जेवढ जास्त शिक्षण तेवढी लग्नाच्या बाजारात तिची किंमत जास्त .....खरंच!! लग्नाच्या बाजारात तिची बोली लावली जाते...तिचं दिसण, तिचं शिक्षण, तिचा पगार, तिचं स्त्रीधन आणि काही ठिकाणी हुंडासुद्धा ....या सगळ्या दिव्यातून बाहेर पडल्यानंतरही आयुष्यभर नवऱ्याच्या अहंकाराला कधी कधी तिला नाहक बळी पडाव लागत. आजही काही ठिकाणी घरातल्या महत्वाच्या निर्णयात स्त्रीला सहभागी करून घेतलं जात नाही. समाजाला आजही तिच्या स्वतंत्र अस्तित्वाची पुरेशी जाणीव नाही आहे.

समाजाच सोडा किती स्त्रियांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव असते? हा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारावा ...
लहानपणी वडिलांचे आणि लग्नानंतर नवऱ्याचे नाव तिच्या नावापुढे लागते ...यात काही गैर नाही पण तिच्या स्वतंत्र नावाला कधी मान्यता मिळेल? जरासुद्धा तिने कोणाच्या मनाविरुद्ध, समाजाविरुद्ध आवाज उठवला तर आजही तिचा आवाज दडपला जातो. समाजाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलतो. कधी समाज तिच्याकडे निकोप दृष्टीने पाहिलं ? कधी तो तिच्या आवाजाला न्याय देईल ? खरंच का तो तिच्या स्त्रीत्वाला जपतो? अशी एक न अनेक प्रश्न पडतात पण खरंच का कधी याची उत्तर मिळतील ?

खरचं आता गरज आहे स्त्रीने स्वतःचे बंदिनीचे स्वरूप बदलून सर्वांना आपल्यात सामावून घेण्याऱ्या, वाईट गोष्टींचा नाश करणाऱ्या रागिणीच रूप धारण करण्याची. तशी आजची स्त्री हि बंदिनी राहिली नाही आहे पण आजही परंपरेच्या नावाखाली तिचे पंख छाटले जातात...प्रेमाच्या गोंडस नावाखाली तिच्यावर बंधन लादली जातात .....त्यागाच्या नावावर तिचे सर्वस्व हिरावून घेतले जाते ... हे आता कुठेतरी थांबायला हवे. तिचा होणारा मानसिक त्रास कुठेतरी थांबायला हवं आणि यासाठी स्त्रियांनीच पुढे यायला हवे कारण एक स्त्रीच दुसर्या स्त्रीचे मन जास्त चांगल्या रीतीने ओळखू शकते. या पुरुष प्रधान समाजाकडून कोणत्याही अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्त्रियांनीच एकमेकींचे अस्तित्व जपावे आणि या समाजाच्या, परंपरेच्या बंधनात अडकलेल्या बंदिनीला तिच्या अस्तित्वाचे मोकळे आभाळ मिळवून दयावे.

कोमल .................................२८/६/१०

Sunday, June 13, 2010

निरुत्तर प्रश्न....


कधीकधी आपल्या हातात काहीच नसत..... कितीही प्रयत्न केला न तरीही हातात काहीच लागत नाही.
कितीही ठरवलं तरी काही गणित चुकतात अगदी आपल्याही नकळत ...आणि त्यांची उत्तरहि नाही सापडत.
आयुष्यातील काही प्रश्न असेच निरुत्तर राहतात ... आणि ज्यांना प्रश्न विचारायचे असतात ते ओळखही दाखवत नाहीत.
पण तरीही आपण आपल्या परीने उत्तर शोधायची असतात. गरजेपुरत का होईना ...आपल्याच समाधानासाठी तरी आपण आपली उत्तर शोधायची असतात.

जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काही न काही कारण असतात ...कधी कधी ती कारण कळत नाही आणि आपण सगळ्यांना त्याचा दोष देत बसतो ...साहजिक आहे म्हणा ... मनासारखं नाही झाल कि चिडचिड होते ....
पण 'जे होत ते आपल्या चांगल्यासाठी होत असतं हे कधी विसरू नका' .... त्या मागचीही उत्तर मिळतील ... नक्की मिळतील.... फक्त थोडी वाट बघा योग्य वेळेची ... मग तुम्हालाही पटेल आयुष्यात सगळीच उत्तर निरुत्तर नसतात त्या मागे कारण असतात कधी दृश्य तर कधी अदृश्य ... नाही का ?

कोमल ..................१४/५/१०

आठवणी ....


आठवणींच जग किती अदभूत असत न!! जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा आपण त्या आठवून त्यात हरवून जातो.
कधी मनापासून हसतो तर कधी नकळत डोळेही भरून येतात. अशा कितीतरी आठवणी आपल्या सोबत असतात नाही... शाळेच्या , college च्या, मित्र - मैत्रिणींच्या , अचानक ठरलेल्या पिकनिकच्या, अगदी रागाच्या भरात मित्रांशी केलेल्या भांडणांच्याही अशा खूप काही आठवणी नेहमी आपल्यासोबत राहतात तर काही आपण विसरण्याचा प्रयत्न करत असतो.

कधी पावसात भिजलेल्या आठवणी तर कधी थंडीत गोठलेल्या ..... उन्हात तापलेल्याही आठवणी असतात ज्या खूप चटके देऊन जातात. आठवणी या नाजूक हलक्या पावसांच्या सरीनसारख्या असतात अचानक येऊन भिजवून जातात. कधी भिजावं त्यात मनसोक्त अन नंतर कोरडही व्हावं.

पण उगाच त्यात गुंतून पडण्यात अर्थ नाही आणि योग्यही नाही . कधीतरी विरंगुळा म्हणून ठीक आहे. आपला भूतकाळ तर बदलण शक्य नाही पण म्हणून वर्तमान बिघडवू नये.
पण खरचं त्या कधीच विसरता येत नाही, त्या फक्त पुसट होतात काळाबरोबर....... नवीन आठवणींना पुरेशी जागा देण्यासाठी ....नाही का ?

आम्ही दोघी...

जगात दोन माणसांचे नशीब सारखे असते का? असं कधी होऊ शकत का? अहो , जगाच सोडा ... माझी एक खूप जवळची मैत्रीण आहे... खूप जिवलग सखी... आमची काही फार जुनी ओळख नाही पण तरीही आमचं खूप जमत ... तशी ती माझ्यापेक्षा २-३ वर्षांनी मोठी असेल पण तरीही आमचे विचार खूप जुळतात.

का कुणास ठाऊक पण एकदा आम्ही खूप personal गोष्टी बोलत होतो आणि माझ्या लक्षात यायला लागल कि तिच्या काही गोष्टी, काही घटना माझ्याही आयुष्यात घडल्या आहेत आणि त्यातला काही आताही घडत आहे. सुरवातीला खूप विचित्र वाटलं पण नंतर खूप interesting वाटायला लागल. खरंच असं होऊ शकत का ? आपल्या सारखंच नशीब कुणाच असू शकत का ? तसं पाहायला गेलो तर आमचे विचारही जुळतात फरक इतकाच कि ती जास्तच emotional आहे माझ्याहीपेक्षा ....

सहजच बोलतानाहि आम्ही बोलून जातो 'अरे हे तर माझ्यासोबत घडलंय ...हा विचार माझा आहे' .....मग आम्ही दोघीही त्यावर जोरात हसायला लागतो.... अगदी रस्त्यातही हसायला लागतो आम्ही ....सगळी लोक आमच्या वेडेपणाकडे बघायला लागतात ...पण त्यांना काय माहित आम्ही आमच्याच नशिबावर हसतोय ....

आम्हाला तर आमच्यासारखं नशीब शोधायला जग पालथ घालाव नाही लागल ... तुम्हाला भेटलेय का असं कोणी तुमच्या अगदी जवळच ?

कोमल ....................१/६/१०

भाग 9

तो हाक मारत होता बहुतेक.... पण माझ लक्षच नव्हत सगळ जग थांबलंय आणि मी चालतेय असंच वाटत होत मला...पुढंच नीटस दिसतही नव्हत मला माझे डोळे भरून गेले होते ...

डोक्यात विचारांचं चक्र चालू होत ....सगळी नाती अशीच असतात अप्पलपोटी अन स्वार्थी...प्रत्येकाला आपल्याकडून काहीतरी हवच असत आणि त्यांना हव ते मिळाल , आपल काम संपल कि सगळे असेच जातात एकट करून....मला कळत नव्हते मी कुठे चालले होते ....बस चालत होते जसा रस्ता मिळेल तसा माझ्या तुटलेल्या विश्वासासोबत.....
मला आता दूर जायचं होत सगळ्या भासांपासून दूर .....नात्यांच्या मृगजळापासून खूप दूर .....

समाप्त

भाग 8

किती सहज बोलून गेलास रे ..... कि " विसरून जा मला , माझ्यासोबत काही फायदा नाही आहे तुझा ...."
" फायदा " तुला काय वाटतं मी फायदा म्हणून तुझ्यावर प्रेम करतेय ? प्रेम कोणी फायदा बघून नाही करत ? आणि मला तसं करायचं असत ना तर मी तुझ्या जवळ कधी आलेच नसते ..... तुझ्या जवळ काही नसतानाही मी तुझ्या सोबत होते कारण मला तुला मोठ होताना बघायचं होत आणि आज तुझ्या जवळ या गोष्टी आल्या तशी माझी गरज उरली नाही का तुला ? कि तुझ्या मनात कोणी दुसरीच .......
काळजात चर्र झालं माझ्या ... ठीक आहे जशी तुझी इच्छा ....मी फक्त एकदाच पाहिलं त्याच्याकडे रागाने....त्याची नजर अजूनही खालीच होती .....केवढा तरी राग आला होता मला खरंच वाटत नव्हत हाच का तो माणूस ज्याच्या सोबत मी भविष्याची स्वप्न रंगवली होती आणि आता हा मला अर्ध्या वाटेत सोडून जायला निघालाय....किती रे निष्ठुर आहे तुझ मन एकदाही मनात नाही आल माझ काय होईल....मी काहीच बोलले नाही त्याच पुढच explanation ऐकायला आता मला तिथे थांबायचं नव्हत मी तशीच निघाले तिथून ..........एकदाही मागे न वळून पाहता .....

भाग 7

आज मी खूप खुश होते ....त्याने स्वतःहूनच सकाळी मला फोन केला होता कि आज आपण भेटू का म्हणून ? मलाही त्याला भेटायचंच होत ....आम्ही रोजच्याच ठिकाणी भेटणार होतो....आमची नेहमीची जागा .....कितीतरी दिवसांपासून आमची वाट पाहत होती ...मस्त छान संध्याकाळ होती... शांत वातावरण ...हवेतही गारवा होता थोडा आणि त्यात लाटांचा आवाज ...फार छान वाटत होत मला ....

मी पोहचायच्या आधीच तो तिथे माझी वाट बघत उभा होता ...उगाचच थोडस मंद स्मित केल त्याने रोजच्या सारख नाही विचारल " का उशीर केलास म्हणून...." काहीच नाही बोलला बस !! मी आले तशी आम्ही थोड पुढे गेलो असचं चालत ....मग बसलो वाळूत. माहित नाही पण मला आज थोडं त्याच वागण काहीस वेगळ वाटत होत तो खूप शांत वाटत होता रोजच्यासारखा नाही बोलत होता आणि बसलाही माझ्या पासून थोडा दूर....मी सहजच बोलले ''आता मध्ये काय कोणाला झोपायला जागा ठेवली आहेस ?'' त्यावरही काहीच बोलला नाही ...नाहीतर माझ्या pj वर त्याची comment असायचीच....मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होते पण तो माझ्या नजरेलाही नजर देत नव्हता ...नक्कीच त्याचं मनात काहीतरी चालू होत .....माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली....

Sunday, May 30, 2010

भाग 6

आजकाल आमच बोलण कमी झालय .... एकमेकांना फोन तर करतो पण काहीच बोलत नाही... दोघंही शांत असतो बराच वेळ .....काय झालंय काही कळतच नाही ...

आजकाल भेटतही नाही आम्ही... उगाच कारण देत बसतो तो .....खरचं वेळ नसतो कि त्याला आता भेटायचं नाही आहे ? स्वतःलाच प्रश्न विचारून ...स्वतःशीच बोलून कंटाळा आला आहे मला ...पण उत्तर काही सापडत नाही....का तो मला अस टाळतोय ? त्याला माझी जबाबदारी नाही घ्यायची आहे का? मला कस कळेल त्याच्या मनात काय चाललाय... कठीण आहे ...मला त्याला भेटायचं ...खूप काही सांगायचं आणि खूप काही विचारायचं आहे.....तो भेटेल कि नाही ? माहित नाही आणि भेटलाच तरी उत्तर देईल कि नाही ? हे हि नाही माहित .... त्याला माहिती आहे मला नाही आवडत खोट बोललेलं म्हणून कदाचित तो खरंही बोलत नसेल ......पण तरीही मला त्याला भेटायचं ...जाब विचारायचा आहे ... आतापर्यंत झालेल्या गोष्टींचा ....

भाग 5

खूप घुसमट होतेय रे... तुला समजून घेताना माझी खूप दमछाक होतेय ...कळतच नाही आहे नेमकं तुला काय हवंय ? तुझ्या मनात काय चाललंय ? का रे इतका विचित्र वागतोस? सगळच तुझ्या मनाप्रमाणे तर करतेय माझ्या घरातल्यांचा विरोध असतानाही.... तरीही का तू असा वागतोयस ?आता अजून काय हव आहे तुला ?

सांग, नाही का दिली मी तुला साथ प्रत्येक गोष्टीत ? तुला हव तेव्हा हव तिथे नसते का मी हजर ? कुठे कमी पडतेय रे मी ? का माझ प्रेम कुठे कमी पडतेय ? का आपला विश्वास कुठेतरी हरवत चाललाय ?

सांग ना , एवढ काय मागितलं मी तुझ्याकडे ? इतके दिवस आपण एकत्र घालवले, एकमेकांना सांभाळून घेतलं मग आता लग्नच वचन पूर्ण करायला एवढ का कचरतोयस ? विश्वास नाही आहे का तुझा माझ्यावर कि तुझा तुझ्यावरच ?

तुटतेय रे मी ... आतून पूर्णपणे तुटते जेव्हा तू या प्रश्नाला उत्तरच देत नाहीस . अजून किती वाट बघू रे... लोकांचे टोमणे ऐकून कान थकले माझे.... त्यांना बोलताही येत नाही काही कारण तूच काही बोलत नाही आहेस मग मी तरी कशी उत्तर देऊ त्यांना ? असह्य होतंय आता, सवय नाही आहे रे मनाची अशी घुसमट पहायची .....कठीण होतेय रे आता सार .....

Friday, May 14, 2010

भाग 4

आज ऑफिस मधून निघायला थोडा उशीरच झाला ....काय करणार आता pramotion झाल आहे न मग हे सगळ करावंच लागणार ... पण आजच होईल अस वाटल नव्हत ...खूप दमल्यासारख वाटत होत पण तरीही खूप खुश होते मी कधी एकदा त्याला सांगते असं झाल होत. मघाच पासून फोन करतेय ...पण सारखा त्याचा फोन waiting वर ....जराही काळजी वाटत नाही का त्याला माझी? मी कुठे असेन? कशी आहे ? मला उशीर का झाला? मी सारखा फोन का करतेय ? काहीच नाही का वाटत याला ?
मनात गोंधळ आणि डोक्यात विचारांचा नुसता गुंता झाला होता ....पण त्याने साधा मला एक call पण नाही केला. असा कसा हा ? काही कळतच नाही याच .....
जेव्हा त्याला गरज असते तेव्हा त्याला माझी आठवण येते ...मग अगदी मी कितीही बिझी का असेना ....दमलेली का असेना ...त्याच्याशी बोलायला हव... का? कारण त्याला गरज आहे माझी ... कोणीतरी समजून घेण्याची ....जगाशी भांडण करून येतो आणि मग माझ्याशीही वाद घालत बसतो तो कसा बरोबर आहे आणि ते कसे चुकले ....काहीही गरज नसताना उगाच एखाद्या गोष्टीचा डोंगर करण्याची सवयच आहे त्याची ....काहीही करा पण जेव्हा त्याला गरज असेल तेव्हा मी तिथे कोणत्याही परिस्थितीत मी तिथे हजर हवी .....

आणि जेव्हा मला गरज असते तेव्हा ? तेव्हा याला वेळच नसतो ....कधी फोनच लागत नाही ....कधी balance च संपतो कधी battery off होते ....कधी फोन चुकून लागला तर तो बिझी असतो .... मग मी कुठे जाऊ ? कुणाला सांगू ? खरच रे माझ्या आयुष्यात काहीही घडल न अगदी चांगली नाहीतर वाईट ..पण मला सगळ्यात आधी तुझी आठवण येते कधी एकदा तुला सांगते असं होऊन जात... आणि तू !! तू तर तेव्हा कुठेच नसतोस ..... खरच रे जेव्हा मला खरंच तुझी असते न तेव्हा तू कुठेच नसतोस... मी खूप एकटी होऊन जाते रे... मला तेव्हा कुणीतरी हव असत रे आपल ...माझ हक्काचं माणूस ... पण तू नसतोस ....
खूप भरून येते रे तेव्हा मला असं वाटत मी खूप एकटी आहे ....माझं असं कुणीच नाही... मागेही मला बर नव्हत , मला बोलायलाही जमत नव्हत मी दिवसभर call केला नाही तर तुही नाही केलास...एकदाही माझी विचारपूस करावीशी नाही वाटली कि मी कशी आहे? मी काय करतेय? त्या दिवशी तर मला अगदी भरून आलं होत ...अगदी अचानक आभाळ भरून आल्या सारखं....

आज पण तेच झाल..... मला तुला आनंदाची बातमी सांगायची होती आणि तुला वेळच नाही आहे माझ्याशी बोलायला आणि साधी माझी विचारपूस करायलाही ....मी खरंच इतके परकी आहे का रे तुला? माझा प्रश्न मलाच नेहमी निरूत्तर करतो ...आणि मी फक्त डोळे भरून वाट बघत असते ..... तुझ्या फोनची...... तेवढ्याच आतुरतेने .........

Saturday, May 8, 2010

भाग 3

आज तो ओरडला माझ्यावर .....ओरडला कसला खेकसलाच ....'झाल तुझ पकवून .... अजून किती lecture देशील बाई...तुझी अक्कल तुझ्याच जवळ ठेव ..मला नको शिकवूस शहाणपण ... अतिशहाणी झालीस न आता ...जास्त काळात तुला गरजेपेक्षा जास्त ...बिनडोक कुठची ....'
लागले हे शब्द मला.....खरतर खूप टोचलेच ...गप्पच बसले मी ...

हा तोच न ...ज्याला आधी माझ बोलण आवडायचं ..पटायचं ...आणि आता त्याला मी अतिशहाणी वाटतेय ...त्याचे कितीतरी problems मी सहज सोडवले आहेत आणि आता मी त्याला बिनडोक वाटतेय ...स्वतः नीट विचार करू शकत नाही मग माझ्यावर का ओरडतोय ? मी काही चुकीच बोलले का ? उगाच जबरदस्ती shopping करायला लावत होता ....

'ड्रेस घे, नाहीतर bag नाहीतर निदान चप्पल तरी'... फक्त एवढंच तर बोलले
'मला आता काही नको आहे...उगाच का पैसे खर्च करतोयस ....जरा ठेव सांभाळून उद्या आपल्याच उपयोगी येतील कारण मला ठावूक आहे उद्या जेव्हा आपल्या घरातले तयार नाही होणार न...तेव्हा हेच पैसे आपल्या उपयोगी येतील ...आणि मला लागल तर मी घेईन रे मागून ....कशाला आता हि जबरदस्ती ...ते ठेव थोडे तुझ्यासाठी आणि उगाच नसत्या पार्ट्या आणि त्या timepass मित्रांवर पैसे खर्च करू नकोस गरज नसताना ...'

तर राग आला त्याला म्हणे 'जास्त कळत न तुला आता माझ्यापेक्षा, मला तर अक्कलच नाही आहे . जास्त शिकवू नकोस मला. ठाऊक आहे मला कुठे आणि कशावर खर्च करायचा ते .... आणि माझ्या मित्रांबद्दल काहीही बोललेले मला चालणार नाही ..माझी मर्जी मी कधीहि कुणालाही party देईन तुला काय करायचं ...माझ्या गोष्टीत पडू नकोस..'

ह्याची गोष्ट ? मग माझी काय ? तुझ्या आणि माझ्या गोष्टी काही वेगळ्या आहेत का ?
काही बोललेच नाही मी ....गप्पच बसले होते ....स्वतःशीच बोलत ....

Thursday, May 6, 2010

भाग 2

काल खूप दिवसांनी भेटलो आम्ही. किती छान वाटत होत. आम्ही मस्त movie ला गेलो होतो कॉर्नर सीट .... अंधारात त्याने सहज माझ्या खांद्यावर हात टाकला . आधी मी गडबडून गेले ...मग थोडी स्थिर झाले. त्याने मला अजून जवळ घेण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या मनात एक विचार आला ....ज्याच्यासाठी मी हे सगळ करतेय त्याला त्याची जाणीव खरीच आहे का ?

आज दोन वर्ष झाली मी घरातल्यानविरुद्ध उभे आहे त्याच्यासाठी. पण आमच लग्न? ते खरंच होणार आहे का कधी ?
विचारांनीच मन शहारून गेल .... अन अचानक माझी तंद्री भंग झाली. त्याने मला दूर लोटलं आणि तो चिडला माझ्यावर ' आपण इतक्या दिवसांनी भेटलोय तुला काहीच कसं वाटत नाही ...दुसरी एखादी असती तर माझ्या मिठीत कधीच विरघळली असती ...तुझ्या स्पर्शात तर काहीच जाणवत नाही मला. मी आवडत नाही का तुला ?' मी पुन्हा स्थब्ध ....आता कस सांगू याला माझ्या मनात काय चाललाय?
'दोन वर्ष झाली बघतोय तू कधी स्वतःहून हातही नाही पकडलास मग मिठीत येण तर दूरची गोष्ट आहे ...तू इतर मुलींसारखी नाही आहेस ...बघ जरा त्यांच्याकडे त्या बघ कशा त्यांच्या bf ला मिठी मारतात ...तुला नाही का वाटत त्यांच्यासारख करावस ? जराही मुलींची लक्षण नाही तुझ्यात...बिनडोक कुठची ...'

खूप लागले रे मनाला हे सार ... खरचं मला नाही का वाटत हे सगळ करावस ? मलाही वाटत रे , मलाही हव असत हे सगळ ... अशी भावनिक गुंतवणूक , शारीरिक जवळीक .....पण !! पण भीती वाटते रे मला ....उद्या आपलं लग्न झाल नाही तर याचा त्रास होईल रे मला ...तुम्हा मुलाचं काय ..सहज विसराल ....पण माझ ? मी तुझ्या शिवाय कधी कोणाचाही विचार करू शकत नाही ...इतक्या मुलांशी बोलते मी , मस्ती करते पण तुझी जागा खूप खास आहे रे इतरांपेक्षा वेगळी ...जी मी कधी कुणाला नाही देऊ शकत ...मी नाही कधी तुला माझ्या मित्रांसोबत compaire केल ...पण तू...तू तर माझीच जागा दाखवून दिलीस रे मला ....

मी आतापर्यंत तुझे सारे हट्ट, तुझे रुसवे , फुगवे ....सार सार काही पाहिलं ...हे खर तर मला करायला हव होत रे ....पण तुला सांभाळायच काम तर मीच करतेय ....
मला नाही का वाटत ....माझ्यावरही कुणीतरी जीवापाड प्रेम करावं ...माझ्यासाठी त्याने धावत याव ...माझे लाड करावे, माझे हट्ट पुरवावे....पण इथे तर सगळ उलटंच आहे. मला तर असं काहीच वाटत नाही कि माझ्या भावनांची साधी दखलही घेतली जाते ...मला काय हवाय ..काय नकोय ...
साधी विचारपूसही नाही...किती हा कोरडेपणा भावनांचा ..

मग आता तूच संग मी कशी येऊ रे तुझ्या जवळ ?
तुला तर माझ मनही अजून नीटस जाणता येत नाही ...
जिथे भावनिक गुंतवणूकच नाही होत आहे तिथे शारीरिक जवळीक तरी कशी होईल ?
सांग ना तूच सांग मला ....
किती बोलले मी पण फक्त मनात ...माझा धीरच झाला नाही त्याला काही बोलायला ....
फक्त डोळे भरून आले...आणि मनही...

मृगजळ .... एक भास आपलेपणाचा ..भाग 1

किती सहज बोलून गेला तो 'जरा आरशात बघ स्वतःला.... कशी दिसतेयस .... जरा नीट राहत जा इतर मुलींसारखी. किती जाडी दिसतेयस... आधी किती छान दिसायचीस .फक्त तुझ्याकडे पाहत रहावसे वाटायचे मला आणि आता माझे लक्ष दुसऱ्या मुलींकडे सहज जाते. तुला नाही आवडत आजकाल बघायला.'

हे ऐकून मी स्तब्धच झाले ...काय बोलावं सुचेना ...मला तर काय reaction द्यावी हे हि कळत नव्हते . मी काहीच न बोलता घरी निघून आले आणि उगाच आरशासमोर जाऊन उभी राहिले ...खरंच काय मी इतकी वाईट दिसते ? हा !! आजकाल मला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नसतो रोजच्या गडबडीत ....पण म्हणून काय त्याने अस बोलावं ?
नकळत माझे डोळे भरून आले ....

तो हि खूप बारीक होता मी कधी त्याला बोलले नाही असं ... तो जसा आहे तसाच मला आवडतो ...
एखाद्याची उंची, जाडी, रंग, रूप का कोणाच्या हातात असते ? ते तर देवाने आपल्यासाठी ठरवून दिले आहे तसे आपण दिसतो ...मग त्याचे माझ्यावर प्रेम आहे कि माझ्या शरीरावर ?

हा तोच होता ना जो आधी माझी सौंदर्याची स्तुती करायचा, ज्याला आधी माझ दिसण, वावरणं आवडायचं ... आणि आज त्यालाच मी कशीतरी दिसतेय , माझ्याकडे बघवत नाही त्याला ...खरंच का मी इतकी वाईट आहे ?
माझ्यासोबत चालायलाहि त्याला लाज वाटत होती ....सारखा मागे नाहीतर पुढे चालत होता ...
आज याला माझ्यासोबत दोन पावलं चालायला लाज वाटतेय ...उद्या सात जन्म काय आणि कसा चालणार हा माझ्यासोबत ?
आपल्या जोडीदाराची लाज वाटते अशा माणसासोबत मला संसार करायचाय ... कसा करू मी ?
माझी पावलं तिथेच घुटमळली होती ....

Tuesday, May 4, 2010

पाऊलखुणा.........




समुद्रकिनारी ओल्या वाळूतल्या चिमुकल्या खेकड्यांनी ओढलेल्या रेघोट्या पहिल्या, कि मनाला एक प्रश्न पडतो....
आपणसुद्धा उमटवू शकतो का आपल्या आयुष्याच्या वाळूवर आपल्या अस्तित्वाचे ठसे?
कदाचित उमटतीलहि...पण ते ठसे कितपत टिकतील कोण जाणे?

जीवनाच्या वाळूवर ठसा उमटवायचा असेल तर पाऊल दमदार आणि ठाम हवं, आत्मविश्वासाने टाकलेलं !!
जमिनीचा भक्कम आधार घेऊन नेटाने पुढे जाणार हवं, परिस्थितीशी झगडून मार्ग काढणार असावं!!

तरच उमटेल वाळूवर आपला ठसा.... आपली निशाणी मागे राहील .....
चवड्यांवर चालणार्या माणसांचे ठसे उमटत नाहीत कारण त्यांच्या पावलात आत्मविश्वास नसतो.
त्यांच्या जगण्यात दमदारपणा नसतो. ते चालतात पण त्यांची दखल घेतली जात नाही ...
मला माझ्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा जीवनाच्या वाळूवर मागे ठेवायला आवडेल .... त्या चिमुकल्या खेकड्यानसारख्या.....
आणि तुम्हाला?

कोमल .....................४/५/१०

प्रेम !!


प्रेम !! फक्त दोनच शब्द पण किती अर्थपूर्ण !
एवढ्या छोट्याश्या शब्दात किती भावना लपल्या आहेत... प्रेम ठरवून नाही करता येत ते बस होऊन जात...अगदी आपल्याही नकळत.... आयुष्य अस बेधुंद होऊन जगत असताना ते कधी आपल्या मनाचा दरवाजा उघडून हळूच चोर पावलानेआत प्रवेश करते काळातही नाही !!

प्रेम माणसाला खऱ्या अर्थाने माणसात आणते. अगदी पहाडासारख्या माणसालाही ते रडवू शकते एवढी ताकद आहे प्रेमामध्ये. असं म्हणतात कि प्रेम आंधळ असते पण माझा विश्वास आहे कि जर ते डोळसपणे केले तर त्याच्याइतकी सुंदर गोष्ट जगात नाही आहे.

प्रेम जितके देऊ तितकेच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त तुम्हाला परत मिळते. आईचे आपल्या मुलांवर असलेले प्रेम, कसलीही अपेक्षा न ठेवता एखाद्यावर सर्वस्व अर्पण करणारी व्यक्ती, लहान मुलांचे निरागस प्रेम यांच्याइतके निस्वार्थ प्रेम असूच शकत नाही.

आजकाल करीयरच्या मागे धावणाऱ्या पिढीला प्रेम, भावना, माणुसकी, आपुलकी, जिव्हाळा यासारख्या गोष्टी जपायला वेळच नसतो.मान्य आहे कि आज प्रत्येक गोष्टीसाठी पैसे गरजेचे आहेत पण तरीही जगातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक सुख आणि प्रेमसुद्धा पैशाने विकत नाही मिळत.
नाही का?

कोमल .........................४/५/१०

Monday, May 3, 2010

प्रश्न ....

लहान मुलांना जसे प्रश्न पडतात न अगदी तसेच प्रश्न किंबहुना जरा जास्तच प्रश्न मला आजही पडतात .
विचित्र वाटेल तुम्हाला वाचून पण खरंच कधी कधी अगदी डोक फुटायचीही वेळ येते ....
का वागतात लोक अस विचित्र ? मग मला का वागता येत नाही?
मी प्रयत्नहि करून पाहिला पण मला त्याचा त्रासच जास्त झाला. कस वागू शकतात लोक अशी?
आजकाल तर रक्ताच्या नात्यानमध्येही लोक औपचारिकता आणतात, कस जमत यांना इतक स्वार्थी विचार करायला?

लोक तर प्रत्येक गोष्टीत फायदा बघत असतात. मान्य आहे ती काळाची गरज आहे पण भावनांमध्येही?
माणस इतकी भावनाशुन्य कशी होऊ शकतात?
आई.... मुलांना सांभाळताना , मोठ करताना कधी फायदा बघत नाही.
ती असा विचार नाही करत कि उद्या माझा मुलगा मला सांभाळेल कि नाही ? माझ्याशी कसा वागेल ?
ती या सगळ्या गोष्टी फक्त कर्तव्यभावनेने आणि प्रेमाने करत असते अगदी सहज ...
तरीही तोच मुलगा त्या आईला मोठा झाल्यावर ' ते तर तुझे कर्तव्यच होते , तुला करायलाच हवे होते '
असं बोलून तिच्या प्रेमाचा अपमान करायलाही मागे पुढे नाही बघत.
बाबांनाही उलट बोलायला ते कमी नाही करत. ज्या माणसाने आयुष्यभर त्यांच्यासाठी खस्ता खाल्या त्यालाच वर सुनावतात ' अहो तुम्ही तर आम्हाला काहीच दिले नाही , तेव्हा जास्त शहाणपणा शिकवू नका ' अस बोलायलाही कमी नाही करत. कस वागू शकतात ते असे? लाज नाही वाटत त्यांना अस बोलायला?

जगात सध्या प्रेम, विश्वास, आपलेपणा यासारख्या भावनांना काही किंमत नाही आहे.
खरंच आयुष्य फक्त प्रेमावर नाही जगता येत पैसेसुद्धा तेवढेच गरजेचे असतात.
पण या नश्वर पैशांसाठी स्वतःच्या माणसांना, इच्छेला, प्रेमाला त्यागाच्या गोंडस नावाखाली बळी का दिला जातो?
आयुष्यात सगळ्या गोष्टी काही पैशाने विकत नाही घेता येत.
उद्या तुमच्याजवळ फक्त पैसा असेल पण हक्काची माणसच नसतील तर जगू शकता तुम्ही? कस जगणार?
जगण्यासाठी जस अन्न, हवा, पाणी यांची गरज असते ना तेवढीच किंबहुना
जरा जास्तच प्रेम, विश्वास, आधार आणि आपल्या माणसांची गरज असते.
नाही का ?

कोमल .........................३/५/१०

आयुष्य....


आयुष्य हे समुद्रासारखं असते खोल अन अथांग .
ते जितके वरून सुंदर दिसते त्याहीपेक्षा ते आतून जास्त सुंदर भासते .
मग ते सौंदर्य अनुभवण्यासाठी मी त्यात गुदमरून, बुडून मेले तरी चालेल
कारण मी ते सौंदर्य अनुभवले याचे मला समाधान असेल.
आणि तसेही मला समुद्राचे वेड आहे ...

आयुष्य खूप छोट असते नाही ...
त्यामुळे जितके देता येईल तितके दयावे.
देण्यासाठी फक्त पैसेच असतात का ? याही पेक्षा मौल्यवान असे प्रेम, आनंद,
हास्य, आपलेपणा ,सुख दयावे ....त्यांना पैसेही मोजावे लागत नाहीत.
कारण आयुष्यात जेवढ तुम्ही दयाल तेवढ्याच प्रमाणात किंबहुना दुप्पट प्रमाणात परत मिळवाल.
तेव्हा जेवढ चांगल देता येईल तेवढ देत रहाव.

शेवटी हा निसर्ग नियम आहे ..."जे दयाल तेच परत मिळवाल "
तेव्हा तुम्हीच ठरवा तुम्हाला काय हवंय.....
मला तर नेहमीच चांगल्या गोष्टी हव्या असतात ...
स्वार्थ म्हणा हवा तर माझा .....

कोमल .......................३/५/१०

निर्भय...


कुठेतरी वाचलं होत ...
" जिथे भीती असते , तिथे प्रीती नसते
अन जिथे प्रीती असते ,तिथे भीती नसते "

भीती म्हणजे नकारात्मक बाबींची अंधार कोठडी असते .
निर्भयता हि स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे .
भय हा सदगुणांच्या वाटेवरचा अडथळा आहे .
चुका करताना लाज वाटत नाही मग चांगल्या गोष्टी करताना कसली भीती वाटते?
'ज्याला गवताची भीती वाटते त्याने हिरवळीवर झोपू नये
अन ज्याला पाण्याची भीती वाटते त्याने पावसातहि भिजू नये '

किती दिवस दूर पळणार अस स्वतःच्या भीतीपासून आणि कुठे ?
कधी न कधी त्याला समोर तर जायचंच आहे, मग आजच का नाही ?
बिनधास्त सामोरे जायला हवं स्वतःच्या भीतीला ...मग बघ कस वाटते ते .

विसरू नकोस भित्रे लोक मृत्युपूर्वी अनेकदा मरतात,
अन शूर लोक एकदाच मृत्यूला आपलसं करतात
निर्भय माणूस वादळाच्या कुळातला असतो
आणि मला वादळ बनायचं घोंगावणार ......

कोमल ..................३/५/१०

मैत्री ....


हृदयाच्या झऱ्यातून वाहणाऱ्या या प्रेमरूपी पाण्याचा निखळ खळखळाट म्हणजे मैत्री
आपला पाय घसरला असता तोल सावरण्यासाठी एखाद्या खांद्यावर आपण
मोठ्या विश्वासाने हात ठेवतो तो खांदा म्हणजे मैत्री
दुःख हलक होईपर्यंत मनापासून गळ्यात पडून रडता येत तो आधार म्हणजे मैत्री
काहीही न मागता जो सर्वकाही देतो चार गोष्टी सुनवूनच तो आवाज म्हणजे मैत्री
आपल्या अश्रूंनी ज्याच्या डोळ्यातील आसवं लपत नाही तो अश्रू म्हणजे मैत्री
अनोळखी नात्यांमधूनही जे ओळखीचे नाते असते ते म्हणजे मैत्री

कोमल .................३/५/१०