Sunday, October 31, 2010

नवा दृष्टीकोन....


आमच्या माईला नेहमीच कसं सगळ चकाचक लागत.... अगदी काचेसारख स्वच्छ ....सगळ्याच वस्तू ती अगदीच घासून पुसून ठेवायची ...त्यामुळे आमच घर कसं अगदी स्वच्छ असायचं नेहमीच. तीच अस म्हणण होत कि ज्याचं घर स्वच्छ त्यांच्याकडे लक्ष्मीचा अखंड वास असतो आणि सुख समाधान आनंदाने नांदते. त्यामुळे आमच्या घरात सुद्धा सर्वांना स्वच्छतेची आवड होती. म्हणून आम्हीही कधी कधी कंटाळून तिच्या पुण्याकार्यात हातभार लावायचो. तिचे तर कपडेही अगदी पांढरे शुभ्र असायचे. जराही डाग किंवा सुरकुत्या शोधूनही सापडणार नाहीत. त्यामुळे तिचा बाहेर रुबाबही असायचा.

अशीच एकदा ती officla जायला निघाली होती. घाईतच होती जरा ती त्यामुळे मलाही जाता जाता ओरडून गेली..... खडूस कुठची...आजही तिने तिचा आवडता पांढरा ड्रेस घातला होता ...त्यात ती कशी अजूनच छान दिसायची. माईला जाऊन मोजून पंधरा मिनिटे झाली असतील आणि जिन्यातून मोठ्याने आरडाओरड ऐकू आली...आम्ही धावतच खाली पळालो सगळे ...पाहतो तर काय !!

तिचा पांढरा शुभ्र ड्रेसवर चिखलाचे काही शिंतोडे उडाले होते आणि ती त्या पेपरवाल्या मुलावर ओरडत होती .... तो तिला sorry दीदी बोलून तिची माफी मागत होता अन तरी माची माई काही त्याला सोडत नव्हती. अन आम्ही काही बोलणार एवढ्यातच तिने त्याच्या श्रीमुखात लगावून दिली ....बिचारा कोवळा पोर ते कावरबावर झाल अन डोळे भरून रडायलाच लागल ..मलाही गहिवरून आल ...आमची आई पुढे गेली अन त्या मुलाला तिने बाजूला ओढून घेतलं त्याच रडण थांबवून त्याची माफी मागून त्याला पाठवून दिल तिथून ...तो पर्यंत आमची माई पाय आपटत घरी निघून गेली....

घरी पोहचल्यावर पहिलाच प्रश्न ..."तुम्ही माझे आईवडील आहात कि त्या मुलाचे? ज्याने माझा एवढा चांगला ड्रेस खराब करून टाकला. आधीच मला उशीर झाला होता अन त्यात याने मध्येच मोडता घातला ....त्याच्या खराब हातांनी माझे कपडे अजूनच खराब झाले कसे हो तुम्ही असे काहीच का बोलले नाहीत त्याला? "
त्यावर आमचे वडील शांतपणे बोलले " बाळ , त्या मुलाने तुझे कपडे खराब केले म्हणून तू त्याला मारलस , त्याच्यावर ओरडलीस....आपल्या कपड्यांना डाग पडू नये म्हणून तू त्यांची एवढी काळजी घेतेस पण तेवढीच काळजी तू कधी स्वतःचे किंवा दुसर्यांचे मन जपण्यासाठी घेतलीस ? काही चिखलाच्या शिंतोड्यासाठी तू त्या गरीबाला मारलास ...त्याचा विचार केलास ते शाळेतल पोर घर चालवण्यासाठी जेव्हा त्याच्या वयाची मुल साखर झोपेत असतात तेव्हा तो भल्या पहाटे उठून दारोदारी पेपर वाटायला जातो..त्याला नसेल का वाटत कधी तरी आपणही उशिरा पर्यंत अंथरुणात लोळत पडाव...त्याला मायेचा हात तर सोड तू तर त्याला छोट्याश्या गोष्टीसाठी मारलस सुद्धा .... बाळा, वस्तूंवर साठलेली धूळ झाडण सोप्प असत पण मनावर , विचारांवर साठलेली धूळ काढण कठीण असत ...कपड्यांना जितक जपतेस तितकेच स्वतःच्या आणि दुसर्यांच्याही मनाला जपत जा ....मग बघ तुझ मन तुझ्या कपड्यांपेक्षा जास्त स्वच्छ होईल..."

वडिलांच्या या बोलण्यावर माई काहीच बोलली नाही ...ती फक्त मान खाली करून उभी होती ...वरवर साधे दिसणारे आमचे वडील एवढा विचार करतात हे आम्हाला त्या दिवशीच कळलं होत ....त्यांचा हा नवा दृष्टीकोन आम्हाला खूप काही सांगून गेला ...

कोमल .......................................३०/७/१०