Thursday, May 26, 2011

निर्णय ..
" आमच्या अदितीला वेड लागलाय हो !! तुम्ही तरी समजवा तिला ती तुमच नक्की ऐकेल. आम्ही थकलो तिला समजावून. एवढी धडधाकट मुलगी आहे आणि एका अपंग मुलाशी लग्न करण्यासाठी अडून बसली आहे. आता तुम्हीच समजवा तिला." अदितीची आई अगदीच कळवळीने बोलत होती. " तुम्ही काळजी नका करू. मी समजावीन अदितीला..ती नक्कीच ऐकेल माझ...आज ती ऑफिस मधून आली कि पाठवून द्या तिला. मी बोलते तिच्याशी." माझ्या आईने त्यांना विश्वास दिला.

अदिती !! माझी बालमैत्रीण ..तशी ती माझ्यापेक्षा ४ - ५ वर्ष मोठीच होती पण लहानपणापासून एकत्र वाढलो, खेळलो अन अभ्यासही केला होता..त्यामुळे ती माझी बालमैत्रीणच होती. लहानपणापासून खूप हुशार होती ती..अभ्यासातही अन खेळातही..नंतर उच्च शिक्षण ...चांगल्या पगाराची वरच्या पदाची नोकरी ..सार काही व्यवस्थित होत ...पण तीच लग्नच वय उलटूनही लग्न जमत नव्हत म्हणून तिची आई नेहमी काळजीत असायची अन आज एकदम तिची आई लग्न होऊ नये म्हणून आमच्या कडे विनवणी करत होती. कदाचित लग्न जमत नाही म्हणून कोणत्याही मुलाशी लग्न करून मोकळ व्हाव असा तर ती विचार करत नसेल? उगाच मनात एक विचार येऊन गेला. एकाच सोसायटीत राहूनही बरेच महिने झाले असतील आम्ही एकमेकांना पाहिलंही नव्हत. नेमक काय झाल असेल याचाच मी विचार करत होते. 
" काय ग तुला काही ठाऊक आहे का? अदिती कोणाशी लग्न करतेय ते?" आईने प्रश्नार्थक नजरेने मला विचारलं.
" काहीतरीच काय ग !! गेले कित्येक महिने आमची साधी भेटही झाली नाही मग बोलण तर दूरच."
" ठीक आहे बघू. बोलूया तिच्याशी आज मग कळेल नेमक काय झालाय ते."

" काकू ! येऊ का आत." मी अन आईने एकदम दरवाजाकडे पाहिलं. दाराशी अदिती उभी होती. आज ती आधी पेक्षाही खूप प्रसन्न वाटत होती. तिच्या डोळ्यात एक विलक्षण तेज दिसत होत. कोणत्यातरी दडपणाखाली ती लग्न करत असावी हा माझा अंदाज तिथेच विरून गेला.
" ये ग..आत ये. बैस..मी आलेच." नको म्हणत असतानाही आईने आम्हा तिघांसाठी चहा आणला अन हळूहळू विषयाला सुरवात केली.

"मला ठाऊक आहे काकू तुम्हाला काय विचारायचे आहे ते. मला आता सवय झाली आहे या प्रश्नांची. मला समजून घायच्या ऐवजी सगळेच मला समजावत सुटले आहेत."
" अदिती, तू एवढी समजूतदार आहेस अन तरीही एका अपंग मुलाशी लग्न करण्याचा का विचार करतेयस?"
" अपंग नाही काकू ..निरंजन !! नाव आहे त्याच आणि तो अपंग नाही त्याचा फक्त एक हात मनगटापासून अधू आहे. एवढच काय ते त्याच अपंगत्व बाकी तो एकदम व्यवस्थित आहे काकू. तो हुशार आहे, चांगल्या कंपनीत नोकरीला आहे, समजूतदार आहे, त्याला जबाबदारीची जाणीव आहे मग अजून काय पाहिजे लग्नासाठी एखाद्या मुलामध्ये?  काकू, तो माझ्या मैत्रिणीचा भाऊ आहे. त्याच्या विषयी मला आधीपासून माहित होत पण मी कधी त्याला भेटले नव्हते. रोजच्या कान्देपोह्यांच्या कार्यक्रमाला मी कंटाळले होते. बाजारात लिलाव लावल्या सारखे सगळे येऊन जायचे. कधी काहींना माझ्या नोकरीची अडचण होती तर काहींना माझ्या पगाराची. कधी वयाच कारण द्यायचे तर कधी पत्रिकेच..कोणीही मी जशी आहे तशीच मला स्वीकारायला तयार नव्हते. त्यांना मी नको होते त्यांना त्यांच्या अटींच्या साच्यात बसणारी एक मोलकरीण हवी होती. " हे सांगताना तिची नजर नकळत जमिनीकडे झुकली.

" माझी अन निरंजनची ओळख सहजच झाली. माझ्या मैत्रीणीच्याच घरी.. तो एक चित्र रंगवत होता आणि त्या चित्राच्या रंगांनी माझे लक्ष वेधून घेतले. त्याच्याशी बोलल्यावर जाणवले कि हि व्यक्ती काहीतरी वेगळीच आहे. शारीरिक व्यंग असतानाही त्याच्या बोलण्यात मला जराही निराशा, नकारार्थी गोष्टी जाणवल्या नाहीत. तो फक्त शरीरानेच अपंग आहे मनाने नाही. काकू मला अश्याच मुलाशी लग्न करायचे होते जो जीवनाकडे आशावादी दृष्टीकोनातून पाहतो.

अडचणी तर सगळ्यानच्याच आयुष्यात असतात पण म्हणून का सतत रडत राहायचं ? निरंजन अगदी तसाच आहे त्याच्या व्यंगावरही त्याने मात मिळवली आहे आणि तो हि एका सामान्य मुलाप्रमाणे आयुष्य जगतोय. किंबहुना त्यांच्या पेक्षा जास्त चांगल आयुष्य जगतोय. मग मी का नाही या मुलाचा विचार करावा लग्नासाठी ? मी जशी आहे तशी मला स्वीकारणारा, माझ्या स्वाभिमानाला जपणारा, समजून घेणारा, जबाबदारीची जाणीव असणारा, वास्तवाच भान असणारा आहे निरंजन. मग काय प्रोब्लेम आहे त्याच्याशी लग्न करण्यात ? काकू, एका मुलीला अजून काय हव असत आपल्या भावी पतीकडून? मी असा विचार केला तर यात माझ काही चुकल आहे का ? आता तुम्हीच सांगा.."

अदितीच्या प्रश्नावर तर आई गप्पच झाली होती. पण तिच्या विचारांवर मी मात्र फार खुश झाले. आपल्या मैत्रिणीने काहीतरी क्रांतिकारी विचार केलाय आणि तिच्या निमित्ताने का होईना समाजाचे काही विचार तरी नक्की बदलतील यानेच मी खूप सुखावले होते. एक मुलगी म्हणून विचार केला तर ती जे काही बोलत होती ते योग्यच होत. इतक्या वर्षानंतरही अजून आपल्या समाजात असे विचार सहज स्वीकारले जात नाहीत. मग असा विचार करणार्यांना ते वेड ठरवतात. त्यांनी समाजाच्या नियमांच्या विरोधात जाऊ नये यासाठी मग त्यांच्यावर दबाव आणला जातो अगदी घरातूनही. पण अशा लोकांच्या पाठीशी उभे राहाण अन त्यांच्या निर्णयाच स्वागत करण जरुरी आहे याची मला जाणीव झाली. अन मी काही न बोलता अदितीच्या शेजारी जाऊन उभी राहिले आणि तिच्या खांद्यावर विश्वासाने हात ठेऊन तिच्या निर्णयाला आणि विचारांना मूक पाठींबाच दिला.

कोमल ..........................२७/३/११

Tuesday, May 24, 2011

आभाळमाया ....


अरे बापरे!! ७. २५ झाले निघायला हव मला नाहीतर माझी नेहमीची लोकल निघून जाईल. धावतपळत मी स्टेशन गाठले... ट्रेन नुकतीच येत होती. मी जवळ जवळ पळतच पकडली ट्रेन आणि माझी नेहमीची खिडकीजवळची जागा पकडली. ट्रेनला तशी फारशी गर्दी नव्हती. मी माझ्याशेजारची जागा राखून आरामात बसले. २- ३ स्टेशन गेल्यावर हळूहळू गर्दी वाढायला लागली. पुढच्याच स्टेशनवर गाडी थांबली अन मला ओळखीचे स्मित दिसले...जिच्यासाठी मी माझ्या शेजारची जागा अडवली होती.

" सविता " माझी ट्रेन मधली नवीन मैत्रीण!! पण खूप जुनी ओळख असल्यासारखी वाटायची. मध्यम बांधा, सावळा वर्ण, लांब केसांची एक वेणी अन नेहमीच कडक इस्त्रीची साडी अस ते आजच्या काळातल अजब समीकरण होत. वयाची पस्तीशी ओलांडली असेल तरीही अजून तरुण मुलींना लाजवेल इतकी निरागस, गोड होती. तिच्या चेहऱ्यावर तिचं वय कधी दिसलेच नाही ...कदाचित ते तिच्या बोलक्या डोळ्यांमध्ये किंवा गोड हास्यामध्ये लपून जात असावे. एक विलक्षण व्यक्तिमत्व !! गर्दीतही उठून दिसणारी ...माझी प्रिय मैत्रीण सविता !! तिला पाहिलं कि मन अगदी प्रसन्न होऊन जाई. आमच्या गप्पा अगदी घरापासून ते राजकारणा पर्यंत चालायच्या अगदी मनसोक्त ...कितीही आणि कधीही... तीच स्टेशन येईपर्यंत आमची बडबड चालायाची. मी कधी एकदा तिला भेटतेय अस होऊन जायचं मला म्हणून तर माझी ठरलेली ट्रेन मी कधी चुकवायची नाही. ती तशी वाणिज्य शाखेची पदवीधर होती. पूर्वी कधी काळी ती बँकेत नोकरीलाही होती म्हणे पण आता ती एका मुकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिकेचे काम करत होती. एवढी बोलकी मुलगी त्या शाळेत मुक्या मुलांशी कसा बर संवाद साधत असावी याचेच मला राहून राहून आश्चर्य वाटायचे.

" काय ग!! कुठे हरवली आहेस मंद ? " अस बोलून ती माझ्या शेजारी येऊन बसली सुद्धा ...
"काही नाही ग असंच ..उगाच काहीतरी.."
"का ग! काय झाल ? कुणाशी भांडण झाल कि काय तुझ ? " आमचा विषय असा कुठूनही कसाही सुरु होतो अगदी न सांगता ....
" हे घे !! तुझ्यासाठी chocolate "
" कशाबद्दल ग ? तुझा तर आज वाढदिवस नाही आहे." मी उगाच चौकसपणे विचारलं.
" अरे काही नाही ग असंच ..सहजच " माझ्या नजरेला नजर न देता तिने अडखळतच उत्तर दिल. का ? कुणास ठाऊक .. पण मला ते खटकल. या आधी तिने कधी अस अडखळत उत्तर दिल नव्हत ..
" सांग ना ग !! कशाबद्दल ते ..तू काहीतरी लपवते आहेस ." तशी माझी आणि तिची जुनी ओळख नसली तरी आतापर्यंत आम्हाला एकमेकींच्या सवयी चांगल्याच माहित झाल्या होत्या.
" अरे आज शाळेत एका मुलाचा वाढदिवस होता. म्हटलं तुला द्याव म्हणून दिल बस !!एवढंच आणि काही नाही."

तिने अगदी सहजपणे विषय टाळला आणि आमच्या नेहमीच्या गप्पा सुरु झाल्या. मला राहून राहून तिचं वागण फार वेगळ वाटत राहील. नेहमी प्रमाणे तिने गोड निरोप घेतला पण घरी येतानाही माझ्या डोक्यात मात्र विचारचक्र सुरु होत. ती तशी चांगली मुलगी होती अगदी कोणालाही आवडेल अशीच पण तिचं अजून लग्न झाल नव्हत... का तिने केल नव्हत? या विषयावर अजून आमच बोलण झालच नव्हत कधी..का तिने जाणून बुजून हा विषय टाळला होता ? माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरु होत...उद्या तिला नक्की विचारायचं अस मी मनाशी ठरवल.

दुसर्या दिवशीही नेहमीप्रमाणे गोड हसत माझ्या शेजारची तिने जागा घेतली. आमच्या गप्पा तर सुरु होत्या अन अचानकच मी प्रश्न केला
" काय ग!! तू अजून लग्न का नाही केलंस ? " बोलता बोलता ती एकदम गप्पच झाली.
" असं का ग विचारलास एकदम? "  माझी नजर टाळून ती बोलतेय हे मला कळत होत ...
" सविता प्लीज आज काही लपवू नकोस. मी बऱ्याच दिवसांपासून पाहतेय तू लपवतेयस काहीतरी...सगळ्यांचे सगळे प्रोब्लेम सोडवत बसतेस अन स्वतःचे दुःख मात्र हसऱ्या चेहऱ्यामागे लपवतेस...एवढी पण का ग मी जवळची नाही तुला? सांग न काय झालंय? काय लपवतेयस ?"
" नाही ग!! काही नाही." बोलता बोलता तिचे डोळे पाण्यानी भरले..
" अरे वेडी काय झाल ? रडतेयस का? जाऊ देत नको सांगूस.. मी नाही विचारणार पुन्हा..पण तू रडू नकोस ग ..माझी सविता कधी रडत नाही. " मी उगाच समजावणीच्या सुरात बोलले.
नंतर स्वतःला सावरून ती बोलली " किती ठरवल तरी शेवटी मी पण माणूसच आहे...कोणी असं बोलले कि मला राहवत नाही. सांगते मी.. आज तुला सार काही सांगते ...पण ट्रेन मध्ये नको आपण उतरुया का पुढच्या स्टेशनला ? निवांतपणे बोलू."
आज काहीही झाल तरी तिच्या मनातलं मला जाणून घ्यायचं  होत म्हणून आम्ही दादरला उतरलो. पुढे गर्दीतून वाट काढत आम्ही शिवाजीपार्क गाठलं आणि एका शांत जागेवर निवांत बसलो.
" तुला जाणून घ्यायचं होत ना मी अजून लग्न का नाही केल ते ? " माझी होकारार्थी मान हलताच ती पुढे बोलू लागली ...
"तुला ठाऊक आहे मी तुला बोलले होते मी आधी बँकेत नोकरीला होते. तिथे माझा एक सहकारी होता ..' उदय ' नाव होत त्याच !! अगदी नावाप्रमाणेच होता तो ..उत्साही, प्रसन्न अन बोलका अगदी माझ्याच सारखा....पुढे चहाच्या गप्पा नंतर ऑफिस सुटल्यावरही होत राहिल्या अन आम्ही कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो आमचे आम्हालाही कळले नाही. कुणीच कुणाला लग्नासाठी विचारल नव्हत पण एक दिवस उदय सकाळपासून फार अस्वस्थ वाटत होता. ' तुला काहीतरी सांगायचं आहे..आज भेट मला ऑफिस सुटल्यावर !' एवढंच बोलला. नेहमीप्रमाणे आम्ही भेटलो अन त्याने जे काही सांगितलं त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. उदय घरातलं शेंडेफळ ..त्याच्या दादाचा ३ वर्षांपूर्वीच घरच्यांच्या मर्जीविरुद्ध प्रेमविवाह झाला होता. म्हणून तो वेगळा राहत होता. त्याच्या वडिलांना अर्धांगवायूचा आजार जडला होता अन आईला आता वयोमानानुसार ऐकू कमी येत होत. उदयच म्हणण होत कि त्याच्या दादामुळे त्याच्या आई वडिलांना जो मनस्ताप झाला होता, ते त्याने पाहिलं होत. ते सगळ आता परत आमच्या प्रेमामुळे पुन्हा होऊ नये असं त्याला वाटत होत.

" दादाच्या लग्नानंतर मी ठरवलं होत कि मी आई वडिलांच्याच मर्जीने लग्न करणार. या वयात आता आई बाबांना मला अजून कोणताही त्रास नाही दयायचा आहे...त्यांनी माझ्यासाठी, आमच्या घरासाठी खूप काही केल आहे...सविता माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मलाही माहित आहे कि तू हि माझ्याशिवाय नाही राहू शकत. पण माझा नाईलाज आहे ग..मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. आपल्या प्रेमाला नाव नाही देऊ शकत..माफ कर मला मी तुझा अपराधी आहे. खरतर मी तुला हे आधीच सांगायला हव होत... पण तुझ्या प्रेमामुळे मला सगळ्यांचाच विसर पडला होता. काल आईने लग्नाचा विषय काढला तेव्हा मला एकदम तूच आठवलीस अन मी अस्वस्थ झालो.. " त्याच्या या बोलण्यानंतर तर माझ जग तर थांबलच होत. पण तो बोलत होता, " मी आयुष्यात पहिल्यांदाच आणि शेवटचंच प्रेम केल. मी प्रेमविवाह करणार नाही अस ठरवल होत पण तुला भेटल्यानंतर आता लग्नच करायचं नाही असंच ठरवला आहे मी. तुझी जागा कोणीही नाही घेऊ शकत आणि नाही मला ती कोणाला दयायची आहे. सविता, पण तुला मी अडवणार नाही. तू लग्न करू शकतेस..तुझ्या इच्छेनुसार आणि त्यावर माझी काहीच हरकत नसेल उलट माझ्याहीपेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम करणार कोणी तुला भेटलं तर मलाच जास्त आनंद होईल. पण मी आपल्या नात्याला शेवटपर्यंत नाही नेऊ शकत..माझ्यात ती हिम्मत नाही म्हणून नाही तर माझ्या आईवडिलांना दिलेलं वचन मी नाही मोडू शकत म्हणून मी असं बोलतोय. प्लीज मला चुकीच समजू नकोस ...मी तुझा खरच गुन्हेगार आहे. तू देशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे.मी तुझ्या माफीचा लायक नक्कीच नाही आहे. सांग !! काय करू मी ? "

त्याच्या या बोलण्याने मी भानावर आले. पण का कुणास ठाऊक मला त्याचा राग येत नव्हता उलट त्याला असं पाहून मलाच त्रास होत होता. " उदय, तू खरच प्रामाणिक आहेस..आई वडिलांना दिलेल्या वचनाबाबतही अन आपल्या प्रेमाबाबातही ...तुझ्या बोलण्याने तर खूप त्रास झाला पण आईवडिलांसाठी तू जो निर्णय घेतला आहेस, जो त्याग करणार आहेस त्याचा अभिमानही वाटला...उदय तुझे आईवडील खूप भाग्यशाली आहेत म्हणून त्यांना असा मुलगा मिळाला अन मी हि जिच्या नशिबात तुझे प्रेम होते.. शिक्षा वगैरे काही नाही उदय पण मी हि तुझी जागा कोणाला नाही देऊ शकत आणि तुला जन्मभर साथ देता येणार नाही म्हणून मलाच मी शिक्षा लादून घेणार आहे ती म्हणजे आजन्म अविवाहित राहण्याची ..."

त्यानंतर मी ऑफिस मध्ये जेमतेम आठवडाभर राहिली असेन पण आयुष्यात कधीही उदय आपला होणार नाही हे मी सहन नाही करू शकले अन लगेचच मी राजीनामा देऊन माझ्या गावाला निघून गेले. त्यानंतर उदय अन माझा संपर्कच तुटला..खरतर मीच जाणून बुजून तोडला होता कारण मी हे सगळ सहन नाही करू शकत होते. मग जवळपास काही महिन्यांनी मी पुन्हा मुंबईला परतले अन शिक्षिकेचा कोर्स करून आताच्या या शाळेत रुजू झाले. या मुलांनी मला जीवन नव्याने शिकवले अन माझे हरवलेले हास्य मला पुन्हा मिळवून दिले. उदयने त्याच्या आई वडिलांसाठी आमच्या प्रेमाचा त्याग केला अन मी दुसर्यांचे हास्य जपण्यासाठी स्वतःच्या दुःखाचा त्याग केला....लग्न तर मलाही करायचं होत ग, पण उदयची जागा मी कोणालाही नाही देऊ शकत अगदी स्वप्नातही... त्यामुळे मला माझ्या निर्णयाची जराही खंत वाटत नाही. तेव्हा आता यापुढे मला कधीही विचारू नकोस मी लग्न का केल नाही ते आणि का करणार नाही ते...आता मिळाल का तुझ्या प्रश्नच उत्तर ? मग आता जायचं का? उशीर होईल. " असं बोलून ती उठलीही ..अन मी हि तिच्या पाठोपाठ काही न बोलता चालू लागले..

मनात एक विचार मात्र डोकावून गेला " प्रेम म्हणजे नेहमीच घेण नसत किंवा मिळवण नसत... ते फक्त देत अगदी निस्वार्थपणे...अन असं निस्वार्थ प्रेम करण अन निस्वार्थ प्रेम देण हे सगळ्यांनाच जमत नाही त्यासाठी मन खूप मोठ असाव लागत.....आभाळाएवढं !! "


कोमल नागवेकर ........................२६/३/११

Wednesday, March 30, 2011

आठवणींचे पिंपळपान ...


१४ फेब्रुवारी !! हो! उद्या १४ फेब्रुवारीच आहे!! रात्री घड्याळाला अलार्म लावताना स्नेहाच्या अचानक लक्षात आले. 'अशी कशी विसरले मी .. तस लक्षात ठेवण्यासारख त्यात काही विशेष नव्हतच म्हणा...ना उद्या आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे आणि नाही कधी आपण तो या आधी केला होता..केला कसा नाही म्हणतेय मी!!'  अचानक काहीतरी आठवून ती उठली. " काय ग काय करतेयस? " " काही नाही ग! अचानक एक काम आठवलं मला, जरा ते करून घेते. " आईच्या प्रश्नाला स्नेहाने एका वाक्यात उत्तर दिले. पटापट तिने कॉम्पुटर चालू केला आणि ती gmail मध्ये login झाली. sent mail मध्ये ती काहीतरी शोधत होती. बरच पाठी गेल्यावर 'मुकुंद जोशी' हे नाव तिच्या नजरेस पडलं अन तिचा शोध थांबला. 

तिने तो mail उघडला अन तीच मन पुन्हा एकदा भूतकाळात रमून गेल. लिहिता येत नाही म्हणताना चांगला निबंधच झाला होता तो. तीच तिलाच हसू आलं....
किती बोलते ना मी!! प्रत्येक ओळ तिच्या चेहऱ्यावर नकळत एक हास्य फुलवत होत. 'अगदी कालच सगळ घडलंय अस वाटतेय.' तिच्याही नकळत ती जुन्या आठवणींमध्ये रमून गेली.

तिची अन मुकुंदची ओळख तशी अचानकच झाली होती. मुकुंद तिला सिनिअर होता आणि त्याच्या हाताखाली तीच ट्रेनिंग सुरु झाल होत.  त्याचा रुबाब, त्याच व्यक्तिमत्व, त्याच बोलण या सार्यांनीच ती खूप प्रभावित झाली होती. त्यालाही स्नेहाचा प्रेमळ, बोलका, हळवा स्वभाव, त्याची सतत काळजी घेण आवडायला लागल होत. आधी कामानिमित्त होणाऱ्या भेटी नंतर सवयीच्याच होऊन गेल्या. अन एकत्र  काम करताना ते कधी एकमेकांच्या जवळ आले, त्यांचे त्यांनाही कळले नाही. एकमेकांची स्टेशनवर वाट पाहण ....एकमेकांसाठी थांबण... सी. सी. डी. मध्ये वाफाळणारी कॉफी आणि गप्पांसोबत घालवलेले कित्येक तास...सीफेस वर लाटांच्या साक्षीने एकत्र घालवलेले हळवे क्षण... अशा कितीतरी सुंदर.. हळव्या... गुलाबी आठवणी ...तिचे मन उगाच जुन्या आठवणींने अस्वस्थ झाले.... तिने एक दीर्घ श्वास घेतला अन ती पुढे वाचू लागली.
 
कधी काही वाक्य तिच्या डोळ्यात पाणी आणत तर काही वाक्यांनी तिच्या चेहऱ्यावर नकळत हास्य फुलत होत...'किती वेड्यासारखं लिहिते न मी!' ती स्वतःशीच हसली. पण पुढच्याच काही वाक्यांनी तिचे मन फार अस्वस्थ झाले " तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात वेगळेपण आले आहे. हे असचं सार शेवटपर्यंत राहू देत. या गोष्टी पोकळ ठरवू नकोस. खूप विश्वासाने मी हात पुढे केला आहे, तो अर्धवट सोडून जाऊ नकोस, कारण मला परत उभ राहायला नाही जमणार." 

खरचं मला कधी वाटल नव्हत मी परत उभी राहेन या सगळ्यातून ...ज्याच्या शिवाय माझा दिवस जात नव्हता, ज्याच्या पासून दूर राहण्याने माझा जीव कासावीस होऊन जाई. आज त्याच्याशिवायही मी जगतेय. हो !! मी जगतेय! क्षणभर या विचाराने तिचे मन अस्वस्थ झाले... ' कुणाच्या जाण्याने का कधी आयुष्य थांबत ? खरचं! वेळ कुणासाठीही कधी थांबत नाही आणि काळ हा जुन्या जखमांवर उत्तम औषध आहे. माझी जखम अजून भरली आहे अस वाटत नाही पण सुकली जरूर आहे. अन आज ह्या साऱ्या आठवणी त्यावरची खपली पुन्हा एकदा उकरून काढत आहेत. '

तिन एक दीर्घ श्वास घेतला. मनातले सगळे विचार बाजूला सारून शेवटची ओळ वाचली," या पुढे प्रत्येक १४ फेब्रुवारीला मी तुला असाच निबंध न चुकता पाठवणार आहे, वर्षभरात घडलेल्या रुसव्या फुगव्यानसहीत. तेव्हा आतापासूनच तयार राहा माझ्या निबंधाला उत्तर द्यायला."  'मी आतापर्यंत माझे सगळे शब्द पाळले आहेत अगदी प्रामाणिकपणे, मग मी हे कसं काय विसरले?' ती स्वतःशीच बोलली. मी यावेळीही माझे शब्द पळणार आहे.

काहीतरी लिहायचं ठरवून ती विचार करू लागली. गेल्या वर्षभरात खूप साऱ्या गोष्टी अगदी नकळतपणे घडल्या होत्या. आपली ओळख, नंतरची ओढ, हवाहवासा वाटणारा सहवास, आपली भांडण, तुझ विचित्र वागण, माझ तुला हक्काने ओरडण, समजावण, त्यावर होणारे आपले वाद, छोटे छोटे रुसवे फुगवे आणि त्या नंतरही आपण कसे पुन्हा एकत्र यायचो, मनसोक्त हसायचो!! आपल्याच वेडेपणावर ...सार! सार काही एका क्षणात तिच्या डोळ्यासमोरून गेल. मुठीतली वाळू हातातून एका क्षणात निसटून जावी आणि तिला पकडण्यासाठी आपली केविलवाणी धडपड होतेय असंच काहीस तिला वाटून गेलं...खरचं का रे आयुष्य इतक लहान असतं कि काही सेकंदातच ते अस संपून जात ? ती अशी त्याच्याशी बऱ्याचदा बोलायची पण मनामध्येच, तिच्या प्रश्नांवर तो कधीच उत्तर देणार नाही हे माहित असताना सुद्धा.....

'मला खूप बोलायचं होत रे तुझ्याशी अगदी मोकळेपणाने, मनापासून ...सार काही सांगायचं होत तुला... पण तुझ्या वागण्याने, तुझ्या अहंकाराने मला फार दूर केल तुझ्यापासून....सहा महिन्यातच मला प्रमोशन मिळाल आणि तुझ्या वरची पोस्ट मिळाली याचा तुला कधीच आनंद झालेला मी पाहिलं नाही. उलट ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर अपमानास्पद बोलण, माझ्या कामात चुका नसतानाही चुका काढण, मी इतर कुणा सहकार्यासोबत जरा हसून बोलले तर तुझ रोखून बघण ...अस तुझ विचित्र वागण वाढतच चालल होत. तुला कसं समजवू मला कळतच नव्हत. माझी पोस्ट जरूर वाढली होती पण माझं तुझ्यावर असलेल प्रेम तिळमात्रही कमी झाल नव्हत. पण हे तुला कसं सांगू मला समजत नव्हत ...मी न राहवून एकदा तुला सांगायचा, समजवायचा प्रयत्न केलाही पण तो माझा शेवटचा प्रयत्न ठरला. आपल्यातल अंतर दिवसेंदिवस वाढतच चालल होत आणि आता ते इतक वाढलंय कि ते कमी करण शक्य होईल अस वाटत नाही मला. खूप प्रयत्न केला मी सार काही सांभाळून घ्यायचा पण नाही जमल मला ..शेवटी एका हाताने का टाळी वाजते ? आणि कुणाच्या आयुष्यात असं जबरदस्तीने तरी का रहावं ? मला ओढून ताणून बांधलेले नाते कधीच नको होते. तुझ्या शिवाय जगण्याची कल्पनाच आधी नाही व्हायची पण आता मी स्वतःला तुझ्याशिवाय राहायची सवय लावून घेतली आहे. उलट जमेल तितके तुझे विचार टाळते मी. त्यासाठी माझे कामाचे व्याप मुद्दाम वाढवून घेतले आहेत मी. कितीही राग आला तरी तुझ्याविषयी माझ्या मनात आजही वाईट विचार येत नाही. मनातल्या मनात खूप बोलते रे मी तुझ्याशी अजूनही... म्हणूनच माझे शब्द पाळायचे अस मी ठरवल तर खर... पण आता लिहायचं म्हणतेय तर काहीच कसं सुचत नाही आहे मला...कुठून आणि कशी सुरुवात करू ? काहीच कळत नाही आहे मला ...डोक अगदीच बधिर झाल आहे माझं '

ती तशीच बरच वेळ डोक धरून विचार करत बसली होती.  " स्नेहा आता झोप ग बाई!! उद्या ऑफिसला नाही का जायचं आहे तुला ? सुट्टी आहे का उद्या ? का उगाच रात्र रात्र अशी कामं काढून बसतेस ? मग डोक दुखत तुझ अशाने, झोप आता, पुरे झाल तुझ काम. " आईच्या आवाजाने तिची तंद्री भंग पावली. " नाही ग बाई मला काही सुट्टी बिट्टी नाही आहे उद्या. आलेच मी थोड्या वेळात... हा एक mail करते अन येतेच आहे झोपायला. तू झोप ग नको उगाच त्रास करून घेऊस, आलेच मी "

अस बोलून पुन्हा तिने कॉम्पुटर मध्ये डोक खुपसलं ....
" काळजी घे. खूप पुढे जा. खूप मोठ्ठा हो!! अन पुन्हा कधी मागे वळून पाहू नकोस.
You get whatever you deserve .... God bless you. 
तुझीच ..........."

एवढंच लिहून तिने तो mail पाठवून दिला आणि घाईतच कॉम्पुटर बंद केला. पण तिच्या मनात एक विचार मात्र चमकून गेला, कालचा निबंध आज अगदी चार ओळींचा होऊन गेला आहे, उद्या कदाचित त्याच्यासाठी शब्दच नसतील किंवा कदाचित त्याच्या आठवणीने अस्वस्थ करणारा हा शेवटचा १४ फेब्रुवारी असेल. परिस्थितीनुसार माणूस बदलून जातो हेच खर आहे. कळतही नाही आपला वर्तमानकाळ कधी भूतकाळ होऊन जातो अन भविष्यकाळात त्याची फक्त पुसटशी आठवण ठेऊन जातो. काळ कसा क्षणात आपल रूप बदलतो न !! वहीत दडवून ठेवलेल्या सुकलेल्या पिंपळाच्या पानाप्रमाणे मग उरतात त्या फक्त कोरड्या, पुसटश्या आठवणी ......

कोमल .................५/३/११