Thursday, May 26, 2011

निर्णय ..
" आमच्या अदितीला वेड लागलाय हो !! तुम्ही तरी समजवा तिला ती तुमच नक्की ऐकेल. आम्ही थकलो तिला समजावून. एवढी धडधाकट मुलगी आहे आणि एका अपंग मुलाशी लग्न करण्यासाठी अडून बसली आहे. आता तुम्हीच समजवा तिला." अदितीची आई अगदीच कळवळीने बोलत होती. " तुम्ही काळजी नका करू. मी समजावीन अदितीला..ती नक्कीच ऐकेल माझ...आज ती ऑफिस मधून आली कि पाठवून द्या तिला. मी बोलते तिच्याशी." माझ्या आईने त्यांना विश्वास दिला.

अदिती !! माझी बालमैत्रीण ..तशी ती माझ्यापेक्षा ४ - ५ वर्ष मोठीच होती पण लहानपणापासून एकत्र वाढलो, खेळलो अन अभ्यासही केला होता..त्यामुळे ती माझी बालमैत्रीणच होती. लहानपणापासून खूप हुशार होती ती..अभ्यासातही अन खेळातही..नंतर उच्च शिक्षण ...चांगल्या पगाराची वरच्या पदाची नोकरी ..सार काही व्यवस्थित होत ...पण तीच लग्नच वय उलटूनही लग्न जमत नव्हत म्हणून तिची आई नेहमी काळजीत असायची अन आज एकदम तिची आई लग्न होऊ नये म्हणून आमच्या कडे विनवणी करत होती. कदाचित लग्न जमत नाही म्हणून कोणत्याही मुलाशी लग्न करून मोकळ व्हाव असा तर ती विचार करत नसेल? उगाच मनात एक विचार येऊन गेला. एकाच सोसायटीत राहूनही बरेच महिने झाले असतील आम्ही एकमेकांना पाहिलंही नव्हत. नेमक काय झाल असेल याचाच मी विचार करत होते. 
" काय ग तुला काही ठाऊक आहे का? अदिती कोणाशी लग्न करतेय ते?" आईने प्रश्नार्थक नजरेने मला विचारलं.
" काहीतरीच काय ग !! गेले कित्येक महिने आमची साधी भेटही झाली नाही मग बोलण तर दूरच."
" ठीक आहे बघू. बोलूया तिच्याशी आज मग कळेल नेमक काय झालाय ते."

" काकू ! येऊ का आत." मी अन आईने एकदम दरवाजाकडे पाहिलं. दाराशी अदिती उभी होती. आज ती आधी पेक्षाही खूप प्रसन्न वाटत होती. तिच्या डोळ्यात एक विलक्षण तेज दिसत होत. कोणत्यातरी दडपणाखाली ती लग्न करत असावी हा माझा अंदाज तिथेच विरून गेला.
" ये ग..आत ये. बैस..मी आलेच." नको म्हणत असतानाही आईने आम्हा तिघांसाठी चहा आणला अन हळूहळू विषयाला सुरवात केली.

"मला ठाऊक आहे काकू तुम्हाला काय विचारायचे आहे ते. मला आता सवय झाली आहे या प्रश्नांची. मला समजून घायच्या ऐवजी सगळेच मला समजावत सुटले आहेत."
" अदिती, तू एवढी समजूतदार आहेस अन तरीही एका अपंग मुलाशी लग्न करण्याचा का विचार करतेयस?"
" अपंग नाही काकू ..निरंजन !! नाव आहे त्याच आणि तो अपंग नाही त्याचा फक्त एक हात मनगटापासून अधू आहे. एवढच काय ते त्याच अपंगत्व बाकी तो एकदम व्यवस्थित आहे काकू. तो हुशार आहे, चांगल्या कंपनीत नोकरीला आहे, समजूतदार आहे, त्याला जबाबदारीची जाणीव आहे मग अजून काय पाहिजे लग्नासाठी एखाद्या मुलामध्ये?  काकू, तो माझ्या मैत्रिणीचा भाऊ आहे. त्याच्या विषयी मला आधीपासून माहित होत पण मी कधी त्याला भेटले नव्हते. रोजच्या कान्देपोह्यांच्या कार्यक्रमाला मी कंटाळले होते. बाजारात लिलाव लावल्या सारखे सगळे येऊन जायचे. कधी काहींना माझ्या नोकरीची अडचण होती तर काहींना माझ्या पगाराची. कधी वयाच कारण द्यायचे तर कधी पत्रिकेच..कोणीही मी जशी आहे तशीच मला स्वीकारायला तयार नव्हते. त्यांना मी नको होते त्यांना त्यांच्या अटींच्या साच्यात बसणारी एक मोलकरीण हवी होती. " हे सांगताना तिची नजर नकळत जमिनीकडे झुकली.

" माझी अन निरंजनची ओळख सहजच झाली. माझ्या मैत्रीणीच्याच घरी.. तो एक चित्र रंगवत होता आणि त्या चित्राच्या रंगांनी माझे लक्ष वेधून घेतले. त्याच्याशी बोलल्यावर जाणवले कि हि व्यक्ती काहीतरी वेगळीच आहे. शारीरिक व्यंग असतानाही त्याच्या बोलण्यात मला जराही निराशा, नकारार्थी गोष्टी जाणवल्या नाहीत. तो फक्त शरीरानेच अपंग आहे मनाने नाही. काकू मला अश्याच मुलाशी लग्न करायचे होते जो जीवनाकडे आशावादी दृष्टीकोनातून पाहतो.

अडचणी तर सगळ्यानच्याच आयुष्यात असतात पण म्हणून का सतत रडत राहायचं ? निरंजन अगदी तसाच आहे त्याच्या व्यंगावरही त्याने मात मिळवली आहे आणि तो हि एका सामान्य मुलाप्रमाणे आयुष्य जगतोय. किंबहुना त्यांच्या पेक्षा जास्त चांगल आयुष्य जगतोय. मग मी का नाही या मुलाचा विचार करावा लग्नासाठी ? मी जशी आहे तशी मला स्वीकारणारा, माझ्या स्वाभिमानाला जपणारा, समजून घेणारा, जबाबदारीची जाणीव असणारा, वास्तवाच भान असणारा आहे निरंजन. मग काय प्रोब्लेम आहे त्याच्याशी लग्न करण्यात ? काकू, एका मुलीला अजून काय हव असत आपल्या भावी पतीकडून? मी असा विचार केला तर यात माझ काही चुकल आहे का ? आता तुम्हीच सांगा.."

अदितीच्या प्रश्नावर तर आई गप्पच झाली होती. पण तिच्या विचारांवर मी मात्र फार खुश झाले. आपल्या मैत्रिणीने काहीतरी क्रांतिकारी विचार केलाय आणि तिच्या निमित्ताने का होईना समाजाचे काही विचार तरी नक्की बदलतील यानेच मी खूप सुखावले होते. एक मुलगी म्हणून विचार केला तर ती जे काही बोलत होती ते योग्यच होत. इतक्या वर्षानंतरही अजून आपल्या समाजात असे विचार सहज स्वीकारले जात नाहीत. मग असा विचार करणार्यांना ते वेड ठरवतात. त्यांनी समाजाच्या नियमांच्या विरोधात जाऊ नये यासाठी मग त्यांच्यावर दबाव आणला जातो अगदी घरातूनही. पण अशा लोकांच्या पाठीशी उभे राहाण अन त्यांच्या निर्णयाच स्वागत करण जरुरी आहे याची मला जाणीव झाली. अन मी काही न बोलता अदितीच्या शेजारी जाऊन उभी राहिले आणि तिच्या खांद्यावर विश्वासाने हात ठेऊन तिच्या निर्णयाला आणि विचारांना मूक पाठींबाच दिला.

कोमल ..........................२७/३/११

No comments:

Post a Comment