Wednesday, March 30, 2011

आठवणींचे पिंपळपान ...


१४ फेब्रुवारी !! हो! उद्या १४ फेब्रुवारीच आहे!! रात्री घड्याळाला अलार्म लावताना स्नेहाच्या अचानक लक्षात आले. 'अशी कशी विसरले मी .. तस लक्षात ठेवण्यासारख त्यात काही विशेष नव्हतच म्हणा...ना उद्या आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे आणि नाही कधी आपण तो या आधी केला होता..केला कसा नाही म्हणतेय मी!!'  अचानक काहीतरी आठवून ती उठली. " काय ग काय करतेयस? " " काही नाही ग! अचानक एक काम आठवलं मला, जरा ते करून घेते. " आईच्या प्रश्नाला स्नेहाने एका वाक्यात उत्तर दिले. पटापट तिने कॉम्पुटर चालू केला आणि ती gmail मध्ये login झाली. sent mail मध्ये ती काहीतरी शोधत होती. बरच पाठी गेल्यावर 'मुकुंद जोशी' हे नाव तिच्या नजरेस पडलं अन तिचा शोध थांबला. 

तिने तो mail उघडला अन तीच मन पुन्हा एकदा भूतकाळात रमून गेल. लिहिता येत नाही म्हणताना चांगला निबंधच झाला होता तो. तीच तिलाच हसू आलं....
किती बोलते ना मी!! प्रत्येक ओळ तिच्या चेहऱ्यावर नकळत एक हास्य फुलवत होत. 'अगदी कालच सगळ घडलंय अस वाटतेय.' तिच्याही नकळत ती जुन्या आठवणींमध्ये रमून गेली.

तिची अन मुकुंदची ओळख तशी अचानकच झाली होती. मुकुंद तिला सिनिअर होता आणि त्याच्या हाताखाली तीच ट्रेनिंग सुरु झाल होत.  त्याचा रुबाब, त्याच व्यक्तिमत्व, त्याच बोलण या सार्यांनीच ती खूप प्रभावित झाली होती. त्यालाही स्नेहाचा प्रेमळ, बोलका, हळवा स्वभाव, त्याची सतत काळजी घेण आवडायला लागल होत. आधी कामानिमित्त होणाऱ्या भेटी नंतर सवयीच्याच होऊन गेल्या. अन एकत्र  काम करताना ते कधी एकमेकांच्या जवळ आले, त्यांचे त्यांनाही कळले नाही. एकमेकांची स्टेशनवर वाट पाहण ....एकमेकांसाठी थांबण... सी. सी. डी. मध्ये वाफाळणारी कॉफी आणि गप्पांसोबत घालवलेले कित्येक तास...सीफेस वर लाटांच्या साक्षीने एकत्र घालवलेले हळवे क्षण... अशा कितीतरी सुंदर.. हळव्या... गुलाबी आठवणी ...तिचे मन उगाच जुन्या आठवणींने अस्वस्थ झाले.... तिने एक दीर्घ श्वास घेतला अन ती पुढे वाचू लागली.
 
कधी काही वाक्य तिच्या डोळ्यात पाणी आणत तर काही वाक्यांनी तिच्या चेहऱ्यावर नकळत हास्य फुलत होत...'किती वेड्यासारखं लिहिते न मी!' ती स्वतःशीच हसली. पण पुढच्याच काही वाक्यांनी तिचे मन फार अस्वस्थ झाले " तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात वेगळेपण आले आहे. हे असचं सार शेवटपर्यंत राहू देत. या गोष्टी पोकळ ठरवू नकोस. खूप विश्वासाने मी हात पुढे केला आहे, तो अर्धवट सोडून जाऊ नकोस, कारण मला परत उभ राहायला नाही जमणार." 

खरचं मला कधी वाटल नव्हत मी परत उभी राहेन या सगळ्यातून ...ज्याच्या शिवाय माझा दिवस जात नव्हता, ज्याच्या पासून दूर राहण्याने माझा जीव कासावीस होऊन जाई. आज त्याच्याशिवायही मी जगतेय. हो !! मी जगतेय! क्षणभर या विचाराने तिचे मन अस्वस्थ झाले... ' कुणाच्या जाण्याने का कधी आयुष्य थांबत ? खरचं! वेळ कुणासाठीही कधी थांबत नाही आणि काळ हा जुन्या जखमांवर उत्तम औषध आहे. माझी जखम अजून भरली आहे अस वाटत नाही पण सुकली जरूर आहे. अन आज ह्या साऱ्या आठवणी त्यावरची खपली पुन्हा एकदा उकरून काढत आहेत. '

तिन एक दीर्घ श्वास घेतला. मनातले सगळे विचार बाजूला सारून शेवटची ओळ वाचली," या पुढे प्रत्येक १४ फेब्रुवारीला मी तुला असाच निबंध न चुकता पाठवणार आहे, वर्षभरात घडलेल्या रुसव्या फुगव्यानसहीत. तेव्हा आतापासूनच तयार राहा माझ्या निबंधाला उत्तर द्यायला."  'मी आतापर्यंत माझे सगळे शब्द पाळले आहेत अगदी प्रामाणिकपणे, मग मी हे कसं काय विसरले?' ती स्वतःशीच बोलली. मी यावेळीही माझे शब्द पळणार आहे.

काहीतरी लिहायचं ठरवून ती विचार करू लागली. गेल्या वर्षभरात खूप साऱ्या गोष्टी अगदी नकळतपणे घडल्या होत्या. आपली ओळख, नंतरची ओढ, हवाहवासा वाटणारा सहवास, आपली भांडण, तुझ विचित्र वागण, माझ तुला हक्काने ओरडण, समजावण, त्यावर होणारे आपले वाद, छोटे छोटे रुसवे फुगवे आणि त्या नंतरही आपण कसे पुन्हा एकत्र यायचो, मनसोक्त हसायचो!! आपल्याच वेडेपणावर ...सार! सार काही एका क्षणात तिच्या डोळ्यासमोरून गेल. मुठीतली वाळू हातातून एका क्षणात निसटून जावी आणि तिला पकडण्यासाठी आपली केविलवाणी धडपड होतेय असंच काहीस तिला वाटून गेलं...खरचं का रे आयुष्य इतक लहान असतं कि काही सेकंदातच ते अस संपून जात ? ती अशी त्याच्याशी बऱ्याचदा बोलायची पण मनामध्येच, तिच्या प्रश्नांवर तो कधीच उत्तर देणार नाही हे माहित असताना सुद्धा.....

'मला खूप बोलायचं होत रे तुझ्याशी अगदी मोकळेपणाने, मनापासून ...सार काही सांगायचं होत तुला... पण तुझ्या वागण्याने, तुझ्या अहंकाराने मला फार दूर केल तुझ्यापासून....सहा महिन्यातच मला प्रमोशन मिळाल आणि तुझ्या वरची पोस्ट मिळाली याचा तुला कधीच आनंद झालेला मी पाहिलं नाही. उलट ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर अपमानास्पद बोलण, माझ्या कामात चुका नसतानाही चुका काढण, मी इतर कुणा सहकार्यासोबत जरा हसून बोलले तर तुझ रोखून बघण ...अस तुझ विचित्र वागण वाढतच चालल होत. तुला कसं समजवू मला कळतच नव्हत. माझी पोस्ट जरूर वाढली होती पण माझं तुझ्यावर असलेल प्रेम तिळमात्रही कमी झाल नव्हत. पण हे तुला कसं सांगू मला समजत नव्हत ...मी न राहवून एकदा तुला सांगायचा, समजवायचा प्रयत्न केलाही पण तो माझा शेवटचा प्रयत्न ठरला. आपल्यातल अंतर दिवसेंदिवस वाढतच चालल होत आणि आता ते इतक वाढलंय कि ते कमी करण शक्य होईल अस वाटत नाही मला. खूप प्रयत्न केला मी सार काही सांभाळून घ्यायचा पण नाही जमल मला ..शेवटी एका हाताने का टाळी वाजते ? आणि कुणाच्या आयुष्यात असं जबरदस्तीने तरी का रहावं ? मला ओढून ताणून बांधलेले नाते कधीच नको होते. तुझ्या शिवाय जगण्याची कल्पनाच आधी नाही व्हायची पण आता मी स्वतःला तुझ्याशिवाय राहायची सवय लावून घेतली आहे. उलट जमेल तितके तुझे विचार टाळते मी. त्यासाठी माझे कामाचे व्याप मुद्दाम वाढवून घेतले आहेत मी. कितीही राग आला तरी तुझ्याविषयी माझ्या मनात आजही वाईट विचार येत नाही. मनातल्या मनात खूप बोलते रे मी तुझ्याशी अजूनही... म्हणूनच माझे शब्द पाळायचे अस मी ठरवल तर खर... पण आता लिहायचं म्हणतेय तर काहीच कसं सुचत नाही आहे मला...कुठून आणि कशी सुरुवात करू ? काहीच कळत नाही आहे मला ...डोक अगदीच बधिर झाल आहे माझं '

ती तशीच बरच वेळ डोक धरून विचार करत बसली होती.  " स्नेहा आता झोप ग बाई!! उद्या ऑफिसला नाही का जायचं आहे तुला ? सुट्टी आहे का उद्या ? का उगाच रात्र रात्र अशी कामं काढून बसतेस ? मग डोक दुखत तुझ अशाने, झोप आता, पुरे झाल तुझ काम. " आईच्या आवाजाने तिची तंद्री भंग पावली. " नाही ग बाई मला काही सुट्टी बिट्टी नाही आहे उद्या. आलेच मी थोड्या वेळात... हा एक mail करते अन येतेच आहे झोपायला. तू झोप ग नको उगाच त्रास करून घेऊस, आलेच मी "

अस बोलून पुन्हा तिने कॉम्पुटर मध्ये डोक खुपसलं ....
" काळजी घे. खूप पुढे जा. खूप मोठ्ठा हो!! अन पुन्हा कधी मागे वळून पाहू नकोस.
You get whatever you deserve .... God bless you. 
तुझीच ..........."

एवढंच लिहून तिने तो mail पाठवून दिला आणि घाईतच कॉम्पुटर बंद केला. पण तिच्या मनात एक विचार मात्र चमकून गेला, कालचा निबंध आज अगदी चार ओळींचा होऊन गेला आहे, उद्या कदाचित त्याच्यासाठी शब्दच नसतील किंवा कदाचित त्याच्या आठवणीने अस्वस्थ करणारा हा शेवटचा १४ फेब्रुवारी असेल. परिस्थितीनुसार माणूस बदलून जातो हेच खर आहे. कळतही नाही आपला वर्तमानकाळ कधी भूतकाळ होऊन जातो अन भविष्यकाळात त्याची फक्त पुसटशी आठवण ठेऊन जातो. काळ कसा क्षणात आपल रूप बदलतो न !! वहीत दडवून ठेवलेल्या सुकलेल्या पिंपळाच्या पानाप्रमाणे मग उरतात त्या फक्त कोरड्या, पुसटश्या आठवणी ......

कोमल .................५/३/११