Monday, June 28, 2010

बंदिनी


अगदी जन्मापासून ते मृत्युपर्यंत स्त्रीच आयुष्य कोणाशी न कोणाशी जोडलेलं असत. लहानपणी ती कोणाची तरी मुलगी, बहिण मैत्रीण असते आणि लग्नानंतर कोणाचीतरी पत्नी, काकी, मामी,आत्या, मावशी मग आई, आजी अशी अनेक विशेषणे तिच्या नावापुढे लागतात. खरतर स्त्रीत्व हि दैवी देणगी आहे. आजची स्त्री हि सुशिक्षित, सुजन, कमवती आहे. तिला आपल्या हक्कांची, जबाबदारींची, कर्तव्यांची पूर्ण जाणीव आहे. आज ती सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसते आणि एवढेच नाही तर ती विनातक्रार तिचे घरही तेवढ्याच आनंदाने सांभाळते.

बदलत्या काळानुसार तिच्या आचार विचारात खूप बदल झाला आहे. पण बदलत्या काळानुसार समाजाच्या मानसिकतेत कितीसा बदल झाला आहे ? समाजाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कितीसा बदलला आहे? तिच्या स्त्रीत्वाला जपणारे, तिच्या भावनांचा, विचारांचा सन्मान करणारे असे कितीसे लोक आहेत समाजात?
खरोखर विचारात पाडणारे प्रश्न आहेत हे ......

आजही मुलगी जन्माला येण काही खूप आनंददायी गोष्ट नाही आहे. काही खेड्यातून आजही जन्मापूर्वीच तिचा आवाज बंद करण्यात येतो. तिच्या शिक्षणावर खर्च करण हे काही प्रतिष्ठेच लक्षण मानल जात नाही कारण काय तर शेवटी तिला चूल आणि मुलंच सांभाळायच आहे. फक्त नावापुरत शिक्षण दिल जात कारण जेवढ जास्त शिक्षण तेवढी लग्नाच्या बाजारात तिची किंमत जास्त .....खरंच!! लग्नाच्या बाजारात तिची बोली लावली जाते...तिचं दिसण, तिचं शिक्षण, तिचा पगार, तिचं स्त्रीधन आणि काही ठिकाणी हुंडासुद्धा ....या सगळ्या दिव्यातून बाहेर पडल्यानंतरही आयुष्यभर नवऱ्याच्या अहंकाराला कधी कधी तिला नाहक बळी पडाव लागत. आजही काही ठिकाणी घरातल्या महत्वाच्या निर्णयात स्त्रीला सहभागी करून घेतलं जात नाही. समाजाला आजही तिच्या स्वतंत्र अस्तित्वाची पुरेशी जाणीव नाही आहे.

समाजाच सोडा किती स्त्रियांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव असते? हा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारावा ...
लहानपणी वडिलांचे आणि लग्नानंतर नवऱ्याचे नाव तिच्या नावापुढे लागते ...यात काही गैर नाही पण तिच्या स्वतंत्र नावाला कधी मान्यता मिळेल? जरासुद्धा तिने कोणाच्या मनाविरुद्ध, समाजाविरुद्ध आवाज उठवला तर आजही तिचा आवाज दडपला जातो. समाजाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलतो. कधी समाज तिच्याकडे निकोप दृष्टीने पाहिलं ? कधी तो तिच्या आवाजाला न्याय देईल ? खरंच का तो तिच्या स्त्रीत्वाला जपतो? अशी एक न अनेक प्रश्न पडतात पण खरंच का कधी याची उत्तर मिळतील ?

खरचं आता गरज आहे स्त्रीने स्वतःचे बंदिनीचे स्वरूप बदलून सर्वांना आपल्यात सामावून घेण्याऱ्या, वाईट गोष्टींचा नाश करणाऱ्या रागिणीच रूप धारण करण्याची. तशी आजची स्त्री हि बंदिनी राहिली नाही आहे पण आजही परंपरेच्या नावाखाली तिचे पंख छाटले जातात...प्रेमाच्या गोंडस नावाखाली तिच्यावर बंधन लादली जातात .....त्यागाच्या नावावर तिचे सर्वस्व हिरावून घेतले जाते ... हे आता कुठेतरी थांबायला हवे. तिचा होणारा मानसिक त्रास कुठेतरी थांबायला हवं आणि यासाठी स्त्रियांनीच पुढे यायला हवे कारण एक स्त्रीच दुसर्या स्त्रीचे मन जास्त चांगल्या रीतीने ओळखू शकते. या पुरुष प्रधान समाजाकडून कोणत्याही अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्त्रियांनीच एकमेकींचे अस्तित्व जपावे आणि या समाजाच्या, परंपरेच्या बंधनात अडकलेल्या बंदिनीला तिच्या अस्तित्वाचे मोकळे आभाळ मिळवून दयावे.

कोमल .................................२८/६/१०

No comments:

Post a Comment